लिंगेश्वर देवस्थानाची ‘इस्ताद’ पारंपरिक मानकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा जिल्हा न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती रिव्हिजन याचिका
अर्जदारांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद
कळंबिस्त, सावंतवाडी येथील श्रीदेव लिंगेश्वर पंचायतन देवस्थानाची ‘इस्ताद’ (देवाची मुखवटे, वस्त्रे, दागिने सोन्याच्या नथी इत्यादी. (सामानाची पेटी) देवस्थानाचे मानकरी बुधाजी शिवा राऊळ यांच्या ताब्यात त्वरित देण्यात यावी, असा एक महत्त्वपूर्ण आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. याशिवाय, परंपरेनुसार सदर इस्ताद फेरपाळीने (rotation) ज्या-त्या वर्षीच्या मानकऱ्याकडेच राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्रमुख सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी फौजदारी रिव्हिजन याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. रिव्हिजन अर्जदार बुधाजी शिवा राऊळ यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. पृथ्वीराज रावराणे यांनी युक्तिवाद केला. कळंबिस्त येथील लिंगेश्वर पंचायतन देवस्थानाची इस्ताद पारंपरिक मानाप्रमाणे बुधाजी शिवा राऊळ यांच्या ताब्यात होती. वार्षिक सण व जत्रेपूर्वी गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या मिरवणुकीने मानकऱ्याकडे जाऊन सण साजरा करण्यासाठी ही इस्ताद आणावयाची प्रथा आहे. परंतु, सन २०१३ मध्ये लिंगेश्वर देवळात होणाऱ्या ‘गाडग्याच्या प्रसिद्ध मांत्रे’पूर्वी,११/११/२०१३ रोजी बुधाजी राऊळ यांनी इस्ताद देण्यास नकार दिला. यामुळे गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि राऊळ यांनी इस्तादीचा गैरवापर केला, अशा आशयाची फिर्याद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सावंतवाडी ऑफिस इनचार्ज प्रणिती प्रदीप जाधव यांनी त्याच दिवशी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मुख्य मानकरी बुधाजी राऊळ यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ४०६ (विश्वासाचा भंग) आणि २९५ (अ) (धार्मिक भावना दुखावणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सावंतवाडी यांच्या न्यायालयात चालला. न्यायालयाने बुधाजी राऊळ यांची निर्दोष मुक्तता केली होती.
मात्र, खटल्यातील ‘मुद्देमाल’ अर्थात देवस्थानाची इस्ताद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात यावी, असा आदेश सावंतवाडी न्यायालयाने दिला होता. या आदेशाविरुद्ध बुधाजी राऊळ यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी रिव्हिजन याचिका दाखल केली होती.
जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण अंतिम निर्णय
या रिव्हिजन याचिकेवर प्रमुख सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने रिव्हिजन अर्ज मंजूर केला आणि देवस्थानाची इस्ताद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून घेऊन ती श्री. बुधाजी शिवा राऊळ यांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला.यासोबतच, सदर इस्ताद परंपरेप्रमाणे फेरपाळीने (रोटेशन) मानकऱ्यांच्या ताब्यात राहील, असाही महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने पारित केला आहे.




