सतीश चव्हाण यांची ” कोळीण ” कादंबरी मालवणी जीवनाचे हुबेहूब प्रतिबिंबडॉ सतीश पवार.

प्रकाशनाला साहित्यिक मधुकर मातोंडकर, सरिता पवार, अभिनेत्री दीक्षा पुरळकर, चंद्रसेन पाताडे, अजिंक्य पाताडे यांची उपस्थिती.
” कोळीण ” या कादंबरी मध्ये लेखक सतीश चव्हाण यांनी शिमग्याच्या दिवसात झपाटलेल्या मालवणी मुलखाचे अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे. होळीच्या सणात सादर केला जाणारा खेळे हा मालवणी कलाप्रकार इथल्या लोकांच्या अंतरंगात मुरलेल्या हरहुन्नरी पणाचा तसेच माणुसकीचा प्रत्यय देऊन जातो. ही कादंबरी नक्कीच मराठी साहित्यात मानसन्मान मिळवून जाईल. असे प्रतिपादन साहित्यिक डॉ सतीश पवार यांनी या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त बोलताना कणकवली येथे केले.
लेखक सतीश चव्हाण लिखित कोळीण या त्यांच्या पहिल्याच कादंबरीचे प्रकाशन कवी लेखक डॉ सतीश पवार यांच्या हस्ते कणकवली येथे पार पडले. याप्रसंगी सोहळ्याचे अध्यक्ष साहित्यिक मधुकर मातोंडकर यांनी कादंबरीचे रसग्रहण आणि समीक्षण करून ‘ही कादंबरी मराठी आणि मालवणी साहित्यात एक महत्त्वाचा ठसा उमटवत आहे. इथल्या लोकजीवनाशी प्रामाणिक राहून लेखकाने कादंबरीची मांडणी केली आहे, असे प्रतिपादन केले.
” ‘कोळीण’ च्या रूपाने तळकोकणातील मालवणी मातीतील लोकजीवनाचा वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव त्यातील बारकाव्यांसह मराठी साहित्यात आला आहे. इथल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील त्या जिवंत क्षणांची आठवण व्हावी आणि ही गोष्ट प्रत्येकाला आपलीच वाटावी अशा पद्धतीने ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे, अशी प्रतिक्रिया कवयित्री सरिता पवार यांनी व्यक्त केली.
तर ‘बालपणीच्या जगण्याचा सारा पट या कादंबरीतून उलगडताना पाहता आला. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवाचे खरेखुरे प्रतिबिंब आपल्याला या कादंबरीत अनुभवता येते, असे मत चंद्रसेन पाताडे यांनी मांडले.
अभिनेत्री दीक्षा पुरळकर यांनी कादंबरी प्रकाशनाच्या निमित्ताने लेखकाच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कादंबरी लेखनाच्या प्रवासा विषयी बोलताना लेखक सतीश चव्हाण म्हणाले की, कादंबरी लेखनाच्या दोन वर्षांच्या प्रवासात लेखक म्हणून खूप समृद्ध होता आलं. जे जगणं जगलो तेच वास्तव कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या ह्या पहिल्याच प्रयत्नाला वाचकांनी प्रतिसाद द्यावा. इथून पुढे अशीच साहित्य निर्मिती करण्याचा मानस आहे.’
कणकवली नगरवाचनालय येथे पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला साहित्य रसिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य पाताडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सतीश चव्हाण यांनी केले. तांत्रिक सहाय्य शैलेश घाडी आणि भूषण मेस्त्री यांनी केले.





