राजापूर तालुका चिरेखाण संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद दीपक शिंदे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका चिरेखाण व्यावसायिक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राजापूर तालुका चिरेखाण संघटनेची नुकतीच बैठक हातिवले, तालुका राजापूर येथे पार पडली. सदर सभेत खारेपाटण येथील व्यावसायिक गुरुप्रसाद शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री. शिंदे हे खारेपाटण ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. याबरोबरच जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीवर सदस्य आहेत. तसेच खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे ते सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ते खारेपाटण विभागातील सक्रीय कार्यकर्ते म्हणून पक्षाचे प्रामाणिक काम करीत आहेत.
गुरुप्रसाद शिंदे यांच्या निवडीबद्दल शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव तसेच त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे फोन करून अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!