चिमणी पाखरं च्या ‘तारका’ ने रसिक मंत्रमुग्ध

जिल्ह्यातल्या कलाकारांचं टॅलेंट अधोरेखित

चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये या कार्यक्रमाचं मोफत आयोजन करण्यात आलं होतं. रसिकांच्या उदंड उपस्थितीत सादर झालेल्या या व्यावसायिक दर्जाच्या नृत्य कार्यक्रमान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नृत्य कलाकारांचं टॅलेंट अधोरेखित केलं. एक दर्जेदार कार्यक्रमाचे साक्षीदार राहिल्याचा अनुभव उपस्थित रसिकांना आला.
चिमणी पाखरं प्रस्तुत आणि उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका.. नृत्याचा सुरेख प्रवास’ या नृत्य कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी सायंकाळी मराठा समाज हॉल मध्ये करण्यात आलं होत. या कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पूजन आणि डॉ. नवांगुळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी डॉ. नवांगुळ यांच्यासह अतुल बंगे, द्वारकानाथ घुर्ये, सचिन देसाई, श्री. पाटील, निलेश गुरव, उमेश पाटील, स्वाती पाटील, चिमणी पाखरं चे अध्यक्ष रवी कुडाळकर, सल्लागार सुनील भोगटे उपस्थित होते. सुनील भोगटे यांनी उपस्थित मान्यवरांच स्वागत केलं. यावेळी मान्यवरांनी तारका कार्यक्रमाला शुभेच्छा देतानाच चिमणी पाखरं डान्स अकादमीचं कौतुक केलं.
त्यांनतर सुरु झाला सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक सोबत १४ नृत्य कलाकारांच्या संचात तारका चा प्रवास. अगदी कलेची देवता नटराजाची महती आणि माहिती नृत्यातून उलगडत जात, कधी बॉलिवूड मधील गाणी, कधी लावणी, असा आकर्षक प्रकाश योजनेसह नृत्यमय प्रवास करून जय जय महाराष्ट्र माझा या गीतान कार्यक्रमाची उंची गाठली.
यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. चौसष्ठ कलांचा स्वामी असणाऱ्या गणरायाला आणि नृत्याची देवता अर्थात नटराजला वंदन करून चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या ‘तारकांनी’ आपली कला सादर केली. सुरवातीला नृत्याच्याच माध्यमातून नृत्याची देवता असलेल्या मुद्रेचा अर्थ नृत्याच्याच माध्यमातून सांगण्यात आला. भारतीय आणि पाश्चात्य नृत्याचे विविध प्रकार यावेळी सादर करण्यात आले. यावेळी सेलिब्रिटी नृत्यांगना कु दिक्षा नाईक व सहकलाकारांनी सादर केलेले ‘सैय्या’ या गाण्यावरचे नृत्य पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. कलाकाराचं त्याच्या कलेशी असणारं नातं या सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आलं.
यानंतर ‘तारका’ या शो चा एकमेव पुरुष कलाकार असणाऱ्या निखिल कुडाळकर याने ‘लल्लाटी भंडारं’ या गाण्यावर केलेल्या सादरीकरणामुळे वातावरणात उत्साह संचारला. यावेळी निखिल यांच्या चेहऱ्याचे हावभाव आणि डोळे पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले. यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतावर सादर केलेले नृत्य पाहून सर्वांचा उर अभिमानाने भरून आला. यानंतर ‘तारका’ या शोच्या शीर्षक गीतावर सादर केलेले नृत्यावर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
दीक्षा नाईक, संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर, निखिल कुडाळकर या सिंधुदुर्गातल्या कलाकारांनी आपल्या सुंदर नृत्यांनी रसिकांना जागच्या जागी खिळवून ठेवलं.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार तथा निवेदक निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी चिमणी पाखर डान्स अकॅडमी, अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे, ‘तारका’ या शो चे निर्माते उद्योजक उमेश पाटील आणि तारकाच्या सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. ‘तारका’ हा शो भविष्यात एक मोठा टप्पा गाठेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तारका चे नृत्य दिग्दर्शन, लेखन आणि निवेदन रवी कुडाळकर यांचं होत तर संकल्पना सुनील भोगटे यांची होती. सुजय जाधव आणि तन्मय आईर, श्री राऊळ यांनी इतर बाजू सांभाळल्या होत्या. एकंदरीतच तारकाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं असंच म्हणावं लागेल.

error: Content is protected !!