ठाकरे शिवसेनेकडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध!

माझे कुंकू, माझा देश, टॅगलाईन खाली छेडले आंदोलन

भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी देऊन केंद्र सरकारने तमाम भारतवासीयांचा अपमान केला आहे. तसेच केंद्र सरकारचा व भाजपचा हा खोटारडेपणाचा बुरखा फाडला गेला असून अशा खोटारड्या व स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठीच्या भाजपाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा महिला संघटक नीलम सावंत पालव यांनी सांगितले. कणकवली पटवर्धन चौकी या ठिकाणी केंद्र सरकारच्या या भूमिके विरोधात “माझं कुंकू माझा देश” या टॅगलाईन खाली आंदोलन छेडण्यात आले. कणकवली पटवर्धन चौकात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीने परिसर दणाणून सोडला.
पहलगाम येथील भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भाजपाने खरं म्हणजे आजच्या भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देता नये होती. त्यावेळी भाजपने भूमिका घेताना पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना हिंदू आहात का विचारून गोळ्या घातल्या अशी भूमिका मांडली होती. व हे सत्य असेल तर आता भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? असा सवाल नीलम सावंत यांनी उपस्थित केला. पाकिस्तान सोबत आपण युद्ध पुकारले तर त्यांच्याशी हात मिळवणी करून क्रिकेट का खेळता? अशा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. ही क्रिकेट ची मॅच म्हणजे पाकिस्तानशी हात मिळवणी तर नाही ना? असा सवाल देखील उपस्थित करत केवळ पैसे कमावण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याच्या या घटनेचा शिवसेना महिला आघाडीने यावेळी निषेध केला. पहलगाम हल्ल्यात ज्या पर्यटक महिलांचे कुंकू पुसले गेले त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असून सैनिकांचे मनोबल खच्चीकरण केले जात आहे. या घटनेचा निषेध करत असल्याचेही नीलम सावंत पालव यांनी सांगितले. तालुका संघटक वैदेही गुडेकर, माधवी दळवी, उपतालुका संघटक संजना कोलते, शहर संघटक दिव्या साळगावकर, शाखा संघटक शितल सावंत, संजना साटम, विभाग संघटक प्रतिभा अवसरे, योगिता दळवी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देश बचाओ!!कुमकुम बचाओ!!, दुटप्पी केंद्र सरकारचा निषेध असो !!, हमारा नेता कैसा हो, उद्धव ठाकरे जैसा हो!!, केंद्र सरकार हाय हाय!!, मोदी सरकार हाय हाय!! अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!