कुडाळ पोलिसांची अवैध पानमसाला, सुगंधीत तंबाखूवर कारवाई

तिघांवर गुन्हा दाखल तर १० लाख ७८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू यांची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कुडाळ पोलिसांनी गुरुवारी पहाटे पाठलाग करीत त्या ट्रकसह सुगंधित तंबाखूचा माल मिळून सुमारे १० लाख ७२ हजार ५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू याची वाहतूक केल्याप्रकरणी आणि हा तंबाखू विक्री करता मागवल्याप्रकरणी सुशील बाळकृष्ण परब (वय सुमारे ४० वर्षे, रा. पानबाजार, कुडाळ), गजानन निळकंठ चोपडेकर (वय ६० वर्षे) व हेमंत गजानन चोपडेकर (वय २९ वर्षे) (दोघे राहणार वेंगुर्ला कॅम्प भटवाडी) या तिघा संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना गोपनीय माहिती मिळाली की कुडाळ येथील सुशील परब यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला सुगंधी तंबाखू मागविला असल्याची माहिती मिळाली. यामुळे राजेंद्र मगदूम तसेच इतर पोलिसांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी सात वाजता झाराप झिरो पॉईंट येथे सापळा रचण्यात आला.
या दरम्याने सदरील तंबाखू वाहतूक करणारा ट्रक (क्र MH-09-BC-3502) हा कुडाळच्या, दिशेने येताना निदर्शनास आला असता तो ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच ट्रकचालकाने, ट्रक न थांबवता ट्रक भरधाव वेगात कुडाळच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला व सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास तो ट्रक एमआयडीसी तीठा कुडाळ येथे थांबविला. त्या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये विविध कंपन्यांचे पान मसाला सुगंधित तंबाखू च्या पुड्यांचे बॉक्स, सुगंधी काश्मिरी मसाला पेस्ट, कात पावडर असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे ७२ हजार ५८ रुपये किमतीचा मुद्देमाल व याप्रकरणी वापरण्यात आलेला सुमारे दहा लाख रुपये किमतीचा ट्रक मिळून दहा लाख ७२ हजार ५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात संशयित सुशील परब, गजानन चोपडेकर, हेमंत चोपडेकर यांचे वर अन्न सुरक्षा मानके कलम 59, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 274, 275 3(5)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.पाटील करीत आहेत.
दरम्यान विविध कंपन्यांचा सुगंधित मिश्रित तंबाखू तसेच इतर काच पावडर असे पदार्थ हे सर्व बेळगाव येथून मागविण्यात आले व याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर हा सापळा रचत ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.





