कलमठ बाजारपेठेत शाळेजवळ बिअर बार ला परवानगी नाकारा!

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

हा तर पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा अपमान

कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे निवेदन देत कलमठ बाजारपेठेत प्रस्तावित असलेल्या FLBR-2 बिअर बार व परमिट रूम परवानगीविरोधात आक्षेप नोंदवला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित जागेजवळ जुनी शाळा असून शेकडो विद्यार्थ्यांचा रोजचा वावर आहे. अशा परिसरात बार सुरू झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर व मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होईल.
त्या ठिकाणी पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर असून भाविकांचा सतत वावर असतो. धार्मिक श्रद्धा व भावनांचा अपमान होईल. शिवतेजा मित्रमंडळ या ठिकाणी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबवते. गावाच्या समाजोपयोगी वातावरणात बिघाड होण्याची शक्यता आहे. कलमठ गाव हा सुसंस्कृत व सुशिक्षित लोकवस्तीचा भाग असून, येथे बार सुरू झाल्यास असामाजिक घटकांना वाव मिळून सामाजिक वातावरण बिघडेल.
कणकवली शहर हे फक्त ५०० मीटर अंतरावर असून तेथे आधीच ८-१० परवानाधारक बार सुरू आहेत. त्यामुळे कलमठसारख्या शांत गावात नव्या बारची अजिबात गरज नाही.
“एकीकडे पालकमंत्री गांजा, मटका, गुटखा बंदीवर कारवाई करीत आहेत आणि दुसरीकडे कलमठसारख्या सुसंस्कृत भागात ग्रामपंचायतीकडून बारला परवानगी देणे अयोग्य आहे. जर परवानगी देण्यात आली तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
कलमठ बाजारपेठेतील ग्रामस्थ व सामाजिक संस्थांकडून या परवानगीविरोधात मोठा विरोध व्यक्त केला जात असून, प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!