सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी यांची महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ञ संचालक पदी नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने काजू फळ उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ञ संचालक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या शासन निर्णयान्वये काजू क्षेत्रातील अभ्यासू व अनुभव असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील काजू फळ व उद्योग क्षेत्राचा विकास करण्यासाठी 16 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना करण्यात आली असून मंडळाच्या सुरुवातीस 12 संचालक व 1 सदस्य सचिव अशी रचना होती. यामध्ये काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योग, सहकारी काजू महासंघ आणि तज्ञ संचालक अशा 4 स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सुधारणा करण्यात येऊन स्वतंत्र संचालकांची संख्या चार वरून 11 करण्यात आली. त्यानुसार आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काजू मंडळ महाराष्ट्र राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी, काजू प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच काजू क्षेत्रातील संशोधन विपणन व मूल्यवृद्धी करण्यासाठी कार्यरत आहे. कोकण विभागातील शेतकरी व उद्योजक यांना मंडळाच्या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. काजू मंडळाच्या कार्यात अनुभवी प्रतिनिधींचा सहभाग वाढवून काजू उत्पादन प्रक्रिया व निर्यात या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी श्री दळवी यांच्या झालेल्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला तसेच काजू बागायतदारांना फायदा होणार आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे जिल्ह्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!