वाहतूक नियम मोडणा-यांवर दंडात्मक कारवाई होणार

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन तर्फे आयोजित नियोजन बैठकां मध्ये पोलीस निरीक्षक पोवार यांचे स्पष्ट निर्देश
आचरा-अर्जुन बापर्डेकर
गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येत असतात वाहनांची वर्दळही वाढत असते या दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये उत्सवात कोणतेही विघ्न येवू नये यासाठी प्रत्येक वाहनचालकांने सार्वजनिक ठिकाणी आपल्या वाहनामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित नियोजन बैठकां मध्ये केले. यावेळी त्यांनी नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे सांगितले.
गणेशोत्सव निर्विघ्न आणि मोठ्या आनंदात उत्साहात साजरा व्हावा यादृष्टीने आचरा पोलीस स्टेशन तर्फे आचरा व्यापारी, रिक्षा चालक, ट्रॅव्हल्स, सहा आसणी रिक्षा चालक मालक यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या झालेल्या बैठकींत वाहतूक नियोजनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सवात आचरा तिठाच्या चारी बाजूंच्या रस्त्याने वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत असते. यासाठी रस्त्यावर अडसर ठरेल अशा पद्धतीने कोणी वाहन उभे करत असेल अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच व्यापारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत गणेशोत्सवात आणि आठवडा बाजारादिवशी वाहतूक कोंडी उद्भवू नये यासाठी व्यापारी वर्गाने योग्य ती खबरदारी घेत सहकार्य करण्यास सांगितले. या बैठकीला आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, राजन पांगे, विद्यानंद परब, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, मिलिंद परब ,बबन पडवळ, मनोज पुजारे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!