सावडाव मधील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन छेडणार!

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने वीज अधिकाऱ्यांना निवेदन
सावडाव येथे गेले अनेक दिवस सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शालेय विद्यार्थ्यांचेही विजेअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्युत वाहिन्यांवरील वाढलेली झाडे देखील अद्याप तोडण्यात आलेली नाहीत. वीज पुरवठा सुरुळीत व्हावा यासाठी सावडाव गावातील सामाजिक कार्यकर्त्या नयना वैभव सावंत यांनी आपल्याशी यापूर्वी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याची कोणतीही दखल आपल्या विभागाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे, सदर ठिकाणी नवीन विद्युत ट्रान्सफार्मर बसविणेबाबत कळविले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याठिकाणी नवीन विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यात आला नाही.सावडाव गावातील विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करावा, विद्युत वाहिन्यांवरील वाढलेली झाडे तोडण्यात यावीत आणि गावठणवाडी येथे नवीन विद्युत ट्रान्सफार्मर बसविणे बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा सावडाव ग्रामस्थांसमवेत आपल्या कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना सावंत , ग्रा.पं. सदस्य अजय जाधव, सावडाव शाखाप्रमुख संदीप वारंग , रवींद्र खांदारे, सुहास पाताडे, वैभव सावंत आदी उपस्थित होते.