मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे खड्यांचे साम्राज्य

अपघात होण्याची दाट शक्यता
महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर येथे सद्या महामार्ग रस्त्यावरच अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.तर यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून या गंभीर बाबीकडे महामार्ग प्राधिकरणाने मात्र पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याने माणसे मारण्याची वाट संबधीत अधिकारी बघत आहेत काय ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर हा भाग सद्या अपघात प्रवन शेत्र म्हणून ओळखला जात असून या सिमेंट काँक्रीटीकरणच्या रस्त्यावर पडलेले खड्डे याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.आजपर्यंत इथे अनेक छोटे मोठे अपघात झालेले असून अजूनही अपघात घडत आहेत.महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी वाहने रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघातग्रस्त होत असतात तर यामुळे रस्त्याच्या बाजूने चालत जाणारे पदाचारी याना देखील आपला जीव या अपघातात विनाकारण गमवावा लागतो.
सद्या या महामार्गावर पडलेल्या खड्यांमध्ये लाल माती टाकून खड्डे बुजविण्याचा तात्पुरता केविलवाणी प्रयत्न संबधीत खात्याकडून करण्यात आला असून नागरिकांच्या डोळ्यात एकप्रकारे केलेली ही धूळफेक किंवा चीखलफेक असल्याचे ग्रामस्थ कडून बोलले जात आहे.दरम्यान या महामार्गावर पडलेल्या खडयात टाकलेल्या मातीमुळे सर्वत्र चिखल पसरला असून रस्ता वाहतुकीस निसरडा बनला आहे.त्यामुळे अधिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
तरी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण रामेश्वर नगर येथील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची हायवे प्राधिकरणाने तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करावी.अन्यथा सदर खड्डयात वाहन आदळून अपघात झाल्यास त्याला बांधकाम विभगाचे अधिकारी व महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापन जबाबदार राहील तसेच जर खड्डे न भरल्यास स्थानिक ग्रमस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी संबधीत विभागला दिला आहे.