कणकवली नगरपंचायत च्या 17 प्रभागांसाठी एक सदस्य पद्धती नुसार प्रभाग रचना होणार

शासनाकडून प्रभाग रचनेबाबत प्रशासनाला आदेश
प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित
मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती
नगरपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ घातल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार याबाबतची निवडणूक पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून त्यानुसार प्रभाग रचना व हद्द निश्चितीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कणकवली नगरपंचायत चे यापूर्वी 17 प्रभाग कार्यरत होते या 17 प्रभागांसाठी 17 नगरसेवक असणार आहेत प्रभागांची व शहराची हद्द निश्चिती करत असताना यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या व शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार आवश्यक ते बदल करण्यात येतील अशी माहिती कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. याबाबतचे सविस्तर व स्पष्ट आदेश आल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यामध्ये 17 जून ते 3 जुलै पर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे तर त्यानंतर 4 ते 8 जुलै या कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव आयोगाला सादर करण्यात येणार आहे. 15 ते 21 जुलै पर्यंत सूचना व हरकती मागविण्यात येणार असून 22 ते 31 जुलै या कालावधीमध्ये प्राप्त सूचना व हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. तर 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत अंतिम प्रभाग रचनेच्या मान्यता साठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. तर 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत च्या यापूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार त्यात फारसे बदल होण्याची शक्यता कमी असून नगरपंचायत च्या क्षेत्रातील असलेली लोकसंख्या विचारात घेऊन याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे अशी ही माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वे रुळ,
फ्लायओव्हर आधी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन करण्यात यावी. प्रारूप प्रभाग रचना करत असताना एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याबाबतची दक्षता ही घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याच प्रमाणे मोकळया जागांसह सर्वच जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहीजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, सुविधा केंद्र, दवाखाने, स्मशानभूमी, बाजारहाटाच्या जागा,
पाणी पुरिठयाच्या तसेच जल निसारणाच्या जागा, आदी सोयी सुविधा चा वापर करण्यात येतो त्या प्रभागातच त्या सोई , सुविधा ठेवण्यात याव्यात. प्रभाग रचना करताना प्रगणक गट फोडू नये. असेही आदेश प्रभाग रचना करताना दिले आहेत. प्रभाग रचने साठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. तसेच प्रभाग रचनेत बाबत गोपनीयता पाळायची असून या गोपनीयतेचा भंग झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी विरोधात कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. एक सदस्य प्रभाग रचना करत असताना कणकवली नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यायचे असणार आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे यापूर्वी महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण हे जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात सुरू असलेला मुद्दा व त्यानंतर पुन्हा सत्तेत झालेला बदल यामुळे कणकवली नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे बहुदा पुन्हा नव्याने टाकले जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप प्रशासकीय पातळीवर अधिकृत माहिती प्राप्त नाही.