सिंधुदुर्गात दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा आढळ

मणचे गावात आढळला दुर्मिळ साप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आढळून आला. त्यांना वन्यजीवनिरीक्षणाची आवड आहे. साप दिसताच त्यांनी तत्काळ त्या सापाचे व्हिडिओ आणि फोटो घेतले आणि योग्य ओळख पटविण्यासाठी चिंदर गावचे वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला. स्वप्नील गोसावी यांनी या सापाची ‘काळतोंड्या’ (Dumeril’s Black-headed Snake) अशी ओळख पटवली.
हा साप अंदाजे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीचा असून, त्याच्या डोक्यावर काळया रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला “काळतोंड्या” असे म्हणतात. हा साप बिनविषारी असून स्वभावाने लाजरा आहे. त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो. पाली, सापसुरळी हे त्याचं खाद्य आहे.
ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली असून याबाबतचे नियमित नोंदवहीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे मणचे परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्त्वाची नोंद ठरतो.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, अशा दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन आणि त्यांच्याविषयीची जागरूकता ही काळाची गरज आहे.