शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी चार दिवसाची पोलीस कोठडीची केलेली मागणी फेटाळत न्यायालयाने संशय आरोपीची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड . अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला. कणकवली पोलिसांनी शुक्रवार ४ एप्रिल रोजी संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. याबाबतची फिर्याद सर्वेश हरि भिसे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.
सर्वेश भिसे यांच्या फिर्यादीनुसार, 25 मे 2022 ते 11 ऑक्टोंबर 2024 या मुदतीत आरोपी स्वप्निल बेळेकर याने सर्वेश भिसे याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच तुला दहा ते बारा टक्के दरमहा परतावा दिला जाईल असे सांगितले या आमिषाला बळी पडून सर्वेश भिसे याने देवकन्या बिजनेस वर्ल्ड या कंपनीत 12 लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर स्वप्निल बेळेकर यांना चार लाख 77 हजार रुपये सर्वेश भिसे याला दिले. मात्र उर्वरित सात लाख 23 हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे सर्वेश भिसे याला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले व त्याने कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत होते. त्यादरम्यान संशयित स्वप्निल बेळेकर याला पोलिसांनी वैभववाडी येथून चार एप्रिल रोजी ताब्यात घेत अटक केली. 9 एप्रिल रोजी आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालया समोर हजर केला असता आरोपी जवळ चौकशी करायची असल्याचा युक्तिवाद करत चार दिवसांच्या पोलिस कोठडी ची मागणी केली. मात्र या बाबत अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद करत आरोपीची बाजू न्यायालयासमोर बाजू मांडली त्यावर न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.