जि. प. शाळा शिडवणे नं. १ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
शिडवणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून शाळेतील नूतन ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात’ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय स्वराज्य मंडळाच्या वतीने आयोजित ‘बालसभे’ने झाली. यावेळी शालेय मुख्यमंत्री शफा नदीम शेख, स्वराज योगेश शिंदे आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ७ वी च्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासावर आपले विचार मांडले.
या स्पर्धेचे परीक्षण शाळेचे उपशिक्षक सुरेंद्र यादव व हेमा वंजारी यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये लहान गटात यश धाक्रस (प्रथम), मैथिली टक्के (द्वितीय) व आर्वी येतकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. मध्यम गटात मयुरी सुतार (प्रथम), कार्तिक सुतार (द्वितीय) व विधी शिंदे (तृतीय) तर मोठ्या गटात शफा शेख (प्रथम), शुभ्रा पांचाळ (द्वितीय) व धनश्री सुतार (तृतीय) यांनी यश संपादन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक प्रवीण कुबल व सुरेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सरपंच रविंद्र शेट्ये यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे हा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.





