झाराप येथे एका रात्रीत नवीन शिवपुतळा बसवल्याने खळबळ

कुडाळ तालुक्यातील झाराप येथे महामार्ग लगत अगोदरच असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर उशिरा रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याची घटना घडली असून, परिसरात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पूर्वी झाराप येथे शिवरायांचा पुतळा होता. मात्र नव्या महामार्गाच्या हद्दीत येत तो पुतळा येत असल्यामुळे कामादरम्यान तो हटविण्याबाबत हालचाली होत्या, विकासक कंपनीने नव्या ठिकाणी चबुतरा सुध्दा उभारला होता. या चबुतऱ्यावर पुतळा बसविण्याबाबत प्रशासनाने दोन वेळा कुडाळ पोलीस स्थानकात बैठक घेतली होती. मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्याने प्रश्न प्रलंबितच राहिला होता.
दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उशिरा रात्री अज्ञातांनी महामार्ग विभागाने उभारलेल्या चबुतऱ्यावर नवीन पुतळा बसविल्याने आता त्याठिकाणी दोन पुतळे झाले. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पुतळ्याची विधिवत पूजा केली. यावेळी माजी सरपंच सौ. तेडोलकर, डॉक्टर प्रसाद देवधर, अनिकेत तेडोलकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी झाराप येथे धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून संपूर्ण घडामोडींचा अहवाल तयार केला आहे. तसेच या संदर्भात महामार्ग विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान हा नव्याने उभारण्यात आलेला शिवछत्रपतींचा पुतळा महामार्गाच्या हद्दीत असल्याने त्या विभागाने तक्रार दिली तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.





