सौ.नयना अशोक शिंदे आणि श्रीम.सुलोचना सदाशिव तांबे या सामान्य कुटुंबातील महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान

विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व कडून करण्यात आला महिलांचा सन्मान
विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व यांचे तर्फे महिला दिन साजरा.
ठाणे, दिनांक:5 एप्रिल….पुरस्कार आणि सन्मानाने माणसांच्या कर्तबगारीचा, व्यक्तीत्वाचा गौरव होत असतो. समाजासाठी उल्लेखनीय व मोठे कार्य करणा-या व्यक्तींचा सतत कुठे ना कुठे सन्मान, गौरव होत असतो.
ठाणे पूर्व येथील विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना मात्र सातत्याने समाजात आपापल्या स्थानाहून कार्य करणाऱ्या सामान्य जणांचा गौरव घडवून आणत असते. नुकतेच या संघटनेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने ठाण्यातील दोन सामान्य कुटुंबातील महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी समारंभाच्या अध्यक्ष स्थानी सौ. गीता कडू, विशेष शिक्षिका जय वकिल स्कूल काळाचौकी व विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेविका श्रीम.मालती पाटिल उपस्थित होत्या.
ठाणे येथे बैठ्या चाळीत रहाणाऱ्या व घरोघरी जावून घरकाम करणा-या व त्याद्वारे मुलांना चांगले शिक्षण देवून स्वावलंबी बनविणा-या व आज फ्लॅटमध्ये वास्तव्य करणा-या सौ.नयना अशोक शिंदे यांना तसेच बैठ्या चाळीत राहणा-या आणि पहाटेपासून दुपारपर्यंत चौकात बसून दुधाचा धंदा करणा-या, चार मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या व आज इमारतीमध्ये दोन फ्लॅटमध्ये राहणा-या श्रीम.सुलोचना सदाशिव तांबे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तळागाळातील स्त्रियांच्या कर्तबगारीचा गौरव करून त्यांना समाजात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ नेहमीच पुढे राहिला आहे.
किसन चौरे
विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना…ठाणे पूर्व करिता….





