भिक्षा मागण्यासाठी स्त्री-वेश परिधान करून तृतीयपंथी असल्याचा बनाव

नांदगाव मधील एका युवतीला घेऊन तृतीयपंथी पळाल्याची अफवा

तृतीयपंथी असल्याचे सांगत पैसे मिळवण्याचा नवीन फंडा

पैसे मिळवण्यासाठी भिक्षा मागण्याच्या नावाखाली स्त्रीवेश धारण करून तृतीयपंथी असल्याचा बनाव रचला. हा बनाव आज दोघांच्या अंगलट आला. या घटनेमध्ये आज नांदगाव मधील एका युवतीला संमोहित करून आपल्या सोबत त्यातील एकाने नेल्याने त्या युवतीचे अपहरण केल्याची अफवा पसरली. आणि त्यानंतर एकच नाट्य घडले. नांदगाव मध्ये स्त्री वेशातील दोघा पैकी एकाने तेथील एका युवतीला आपल्या सोबत नेल्याची घटना २७ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. स्त्री वेष धारण केलेल्या त्या दोघांपैकी एक त्या युवतीसह नांदगावमधून सहा सिटरने कणकवली च्या दिशेने निघाला. जानवली पेट्रोल पंपानजीक त्या स्त्रीवेशातील कथित तृतीयपंथीयाला त्या युवतीने अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सहा सीटर मधील अन्य प्रवासी घाबरले, आणि रिक्षा चालकाने रिक्षा पेट्रोल पंपावर आणली. नंतर स्थानिकांनी कणकवली पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार विनोद सुपल, हवालदार विनोद चव्हाण, जाणवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी जाणवली येथे जाऊन दोघांनाही कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर नांदगाव मध्ये असलेल्या तृतीयपंथीय असल्याचा संशय असलेल्या दुसऱ्या व्यक्तिलाही कणकवली पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता स्त्री वेश परिधान केलेले ते दोन्ही तृतीयपंथी नसून पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना देखील पोलिसात बोलावून आणण्यात आले होते. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते बुलढाणा जिल्ह्यातील असून दोघेही आपल्या पत्नी मुले व अन्य कुटुंबीयांसह कुडाळ येथे मागील काही दिवसांपासून राहत आहेत. तृतीयपंथी नसूनही स्त्रीवेश परिधान करण्यामागे भिक्षा मागणे सोपे जावे म्हणून स्त्री वेश परिधान केल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. कथित अपहरण झालेल्या युवतीची मनस्थिती ठीक नसल्याने त्या युवतीला पोलिसांनी कुडाळ येथील एका मनोविकार तज्ञाकडे नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!