भिरवंडेतील आरोग्य शिबिरात 72 जणांची तपासणी

हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने आयोजन

भिरवंडे रामेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून गावातील लोकांसाठी सोमवारी देवालये संचालक मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 72 लोकांची तपासणी करण्यात आली. गावचे सुपूत्र आणि मुंबईस्थित प्रतिथयश डॉ. प्रदीप सावंत, डॉ. श्रीकांत सावंत, डॉ. निर्मला सावंत यांनी ही आरोग्य तपासणी केली.
सोमवारी सकाळी 9.30 वा. मंदिरानजीक या आरोग्य तपासणी शिबिराला प्रारंभ झाला. देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत व अन्य संचालक यांनी शिबिराला भेट देवून शुभेच्छा दिल्या. या आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टरांनी तपासणी करण्याबरोबरच लोकांना आरोग्य विषयक मार्गदर्शनही केले. या आरोग्य शिबिरासाठी सिंधुदुर्ग जि.प. आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले. यावेळी भिरवंडे उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी संस्कृती देशमुख, आरोग्यसेविका शिला कांबळे, आरोग्यसेवक हरिश्चंद्र जाधव, एनसीडी स्टाफ श्रुतिका कदम, आशा स्वयंसेविका साक्षी सावंत, मदतनीस नम्रता सावंत आदी उपस्थित होत्या. यावेळी भिरवंडे उपकेंद्राच्या कर्मचार्‍यांनी लोकांना टीबी, कॅन्सर व कृष्ठरोग विषयी जनजागृती केली. एक्सरेसाठी 20 जणांना संदर्भित करण्यात आले. देवालये संचालक मंडळातर्फे हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!