क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेड जामगे येथे
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची असणार विशेष उपस्थिती
महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ०८ फेब्रुवारी व रविवार ०९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
प्राचीन सत्ताधीश कदम राजवंशाचा इतिहास लाभलेल्या कदम कुटुंबियांना स्वतःचे कुलाचार, परंपरा वारसा याबद्दल माहिती व्हावी , नोकरी व्यवसायात एकमेकांना सहकार्य मिळावे तसेच घराण्यातील नामवंतांचा सन्मान करून प्रोत्साहन देण्याच्या उद्दिष्टाने मराठा कदम परिवार संस्थेने आजतागायत तुळजापूर, गिरवी (फलटण}, गढीताम्हाने (सिंधुदुर्ग), गलांडवाडी (दौंड}, धामधारी (नांदेड}, आंबेचिंचोली (पंढरपूर) या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली. यंदाचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन जामगे येथे विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचे मूळ गावांमध्ये होणार असून महाराष्ट्र सह गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, बडोदा या राज्यातील कदम बांधव उपस्थित राहणार आहेत. ०८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ०७ वाजता कुलदेवता श्री तुळजाभवानीच्या जागर गोंधळाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मागील कुलसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखविला जाणार आहे. कुलसंमेलनाच्या मुख्य दिवशी जामगे गावचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी मानाईदेवीचे दर्शन व पूजन झाल्यानंतर कदम राजवंशाचे ध्वजारोहण गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर बदलापूर येथील सुप्रसिद्ध शस्त्रसंग्रहक सुनील कदम यांच्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते होणार आहे. कुलसंमेलनाचे उद्घाटन रामदास कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रा. डॉ.सतीश कदम, उद्योजक मनोज कदम आणि चिपळूण येथील पराग कदम यांची कदम घराण्याचा इतिहास आणि सद्यस्थितीतील तरुणांना मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. मागील वर्षी ज्या ज्या कदम बंधू भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा कर्तुत्वान कदमांचा सन्मान सोहळा होणार आहे.
या कुलसंमेलनास सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील-कदम, गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर-कदम, पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, घाटकोपर पश्चिम मतदार संघाचे आमदार राम कदम, नांदेड हदगाव विधानसभा आमदार बाबुराव कदम-कोहळीकर उपस्थित राहणार आहेत . या मान्यवरांसह विविध भागातील मान्यवर, उद्योजक, कदमपरिवार या संमेलनास उपस्थित राहणार आहे. तरी सिंधुदुर्गातील सर्व मराठा कदम बंधूंनी या मेळाव्यास मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार राज्यअध्यक्ष अमरराजे कदम (पंढरपूर), सचिव रामजी कदम (माणगाव), उपाध्यक्ष राजन कदम (सिंधुदुर्ग) तसेच जामगे कदम परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.