मनाची निकोप वाढ होण्यासाठी माणसाला अध्यात्माची गरज!

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन

साकेडी येथील जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे कार्यकारी अभियंत्यांच्या हस्ते उद्घाटन

वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळाच्या वतीने सलग सातव्या वर्षी भजन स्पर्धेचे आयोजन

अध्यात्मामध्ये किती ताकद आहे ही माझ्या लहानपणापासून मी अनुभवली आहे. माझे कुटुंब देखील वारकरीच आहे. माणसाचे मन हे इंद्रियाचा राजा आहे. व मनाची निकोप वाढ होण्यासाठी अध्यात्म अंगीकारण्याची गरज आहे. मानव हा विकार नष्ट करू शकत नाही. परंतु या विकारावर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ मानवामध्ये आहे. व ते भागवत संप्रदायातून मिळत असते. मी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या विभागामार्फत काम केले या कामाचे श्रेय या वारकरी संप्रदायाच्या विचाराला जाते. आजची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने जात असताना मात्र अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा वारसा आजच्या या तरुण वर्गाकडून जोपासला जातो ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. असे प्रतिपादन कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले. कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री सर्वगोड बोलत होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आई भगवती कलादिंडी तोरसोळे, द्वितीय क्रमांक ब्राम्हणदेव प्रसादिक भजन मंडळ आचरा पारवाडी, तर तृतीय क्रमांक माऊली प्रसादिक भजन मंडळ मोर्वे यांना मिळाला.
उत्कृष्ट वादक म्हणून संजय मेस्त्री राठीवडे, उत्कृष्ट गायक दिवाकर सावंत चुनवरे यांना गौरवण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी माजी सभापती संजय शिरसाट, स्पर्धेचे परीक्षक विलास ऐनापुरे, सरपंच सुरेश साटम, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदवडेकर, सुदर्शन फोपे, चद्रकांत बांबर्डेकर, ताता गुरव, मुरारी राणे, शामसुंदर राणे, विनायक राणे, गणपत घाडीगावकर, लक्ष्मण गुरव, बुवा गोपी लाड, राजाराम गुरव व अन्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री सर्वगोड पुढे म्हणाले, संत चोखामेळा नेहमीच म्हणायचे की “उस ढोंगा, पण रस नाही ढोंगा” आपले भाव चांगले पाहिजेत आपल्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे हीच खरी साधुसंतांची शिकवण आहे. आपल्याकडे सद्भावना असली पाहिजे व यातूनच तुम्ही विचारावर नियंत्रण मिळवलात तर आपल्याकडे प्रेम, सद्भावना, माणुसकी या गोष्टी आपसूक येतात असे उद्गार देखील श्री सर्वगोड यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक भागामध्ये अध्यात्माची चळवळ येथील लोकांनी रुजवली आहे. व ही चळवळ पुढे नेण्यासाठी जे तरुण काम करतात त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मना – मनातील द्वेष मत्सर घालवूया, प्रेमाचा अंकुर फुलवूया, गरिबांची सेवा करूया, महिलांचा सन्मान करूया, व आपला भारत समृद्ध बनवूया हे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया असे आवाहन श्री सर्वगोड यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक विलास ऐनापुरे म्हणाले, की या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी पंढरी साकारली जाते. यावर्षी साक्षात पांडुरंग या ठिकाणी अवतारला. कारण पंढरपुरातील जन्म असलेले अजयकुमार सर्वगोड हे जरी अभियंता असले तरी त्यांचे मूळ गाव हे पंढरपूर आहे. व पांडुरंगाच्या रूपाने ते या ठिकाणी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून लाभले आहेत. असे गौरवउद्गार विलास ऐनापुरे यांनी काढले. एवढ्या मोठ्या जिल्ह्यातील अनेक कामांची जबाबदारी असताना सुद्धा आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजयकुमार सर्वगोड हे या ठिकाणी उपस्थित राहिले ही निश्चितच वाखाणण्याजोगी बाब आहे. अशा स्पर्धांसाठी भजन मंडळी बोलावणे हे देखील फार जोखमीचे काम असते. एक-दोन भजन मंडळी येताना नाकी नऊ येतात. अशा ठिकाणी तब्बल आठ भजने या मंडळाले एकत्रित केली व आज येथे ही आली ही बाब या जागेचे महत्त्व वाढवणारी आहे. आजच्या घडीला विज्ञान पुढे गेलं ही असेल, पण अध्यात्माची जोड असल्याशिवाय विज्ञान देखील पुढे जात नाही.ही वस्तूस्थिती आहे. अध्यात्माची ताकद समाजामध्ये शांतता निर्माण करेल यामध्ये शंका नाही असे उद्गार श्री ऐनापुरे यांनी काढले. ही स्पर्धा आयोजित करणे हे खूप कठीण काम आहे. मात्र वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळ हे काम गेले अनेक वर्ष सातत्याने करतात ही वाखाणण्याजोगी बाब आहे. बुवा गोपी लाड म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये अजयकुमार सर्वगोड यांचा मोठा वाटा आहे. अधिकारी कसा असावा याचे उदाहरण म्हणून सर्वगोड यांच्याकडे पाहता येईल. या मंडळाने गेले सात वर्षे सातत्याने अशा प्रकारे ही स्पर्धा आयोजित करून एक उत्तम नियोजनाचा आदर्श या निमित्ताने घालून दिल्याचेही त्यांनी सांगितले. या भजन स्पर्धेसाठी आठ भजन मंडळे सहभागी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मंडळांनी भजन स्पर्धेच्या माध्यमातून एक भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. पहाटे चार वाजेपर्यंत ही स्पर्धा चालली. या स्पर्धेच्या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या यशस्वी लोकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला. तर गतिमंद विद्यार्थ्यांचे विद्यालय सुरू केल्याबद्दल आयडियल इंग्लिश स्कूलचे बुलंद पटेल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आनंदाश्रमाचे संदीप परब यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे हे यंदाचे सातवे वर्ष होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व भजन प्रेमी ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!