तलाठी व तलाठी कार्यालय प्रश्नी वायंगणी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

आचरा-अर्जुन बापर्डेकरवायंगणी गावातील तलाठी कार्यालयात आठवड्यातील एक दिवस कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील उपलब्ध होत नसून तलाठी कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. याबाबत तहसील कार्यालयाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने वायंगणी येथील ग्रामस्थ दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांच्यासह ग्रामस्थांनी मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टेय यांना निवेदनाद्वारे दिला आहे. वायंगणी गावात आठवड्यातील एक दिवसासाठी नेमलेला तलाठी देखील उपलब्ध होत नसल्याबाबत तसेच तलाठी कार्यालय इमारतीच्या दुरावस्थे बाबत वायंगणीच्या ग्रामस्थानी मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच रुपेश पाटकर यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी रुपेश पाटकर यांच्यासह माजी सरपंच हनुमंत प्रभू, ग्रामपंचायत सदस्य मालती जोशी, ग्रामस्थ संजय सावंत, रावजी सावंत आदी उपस्थित होते. वायंगणी येथे एक वार कार्यरत असणारे तलाठी त्यादिवशी देखील तलाठी कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने गावातील लोकांची कामे होत नाहीत. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच तलाठी कार्यालयाचे वीज बील थकित असल्याने लाईट सुविधा बंद आहे. इंटरनेट सुविधा व प्रिंटची सुविधा देखील तलाठी कार्यालयात उपलब्ध नाही. तसेच तलाठी हे कार्यालयात न बसता अशासकिय खाजगी जागेत बसून काम करतात असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने तलाठी कार्यालय बंद दिसते. तसेच तलाठी कार्यालयाच्या इमारतीची अवस्था दयनीय आहे त्यामुळे कार्यालय बंद असल्याचे दिसून येते, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून यापूर्वी दोन वेळा पत्र व्यवहार करून देखील तहसिल कार्यालय मालवण यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी नाराजी यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त करत याप्रश्नी न्याय मिळत नसल्याने दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. मालवण तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थानी दिला. यावर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!