आचरा डोंगरेवाडी शेतजमीनीत घुसले खारेपाणी

ठेकेदाराने बंधाऱ्यांची झाकणे काढल्याने घडला प्रकार,
आचरा डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश्य भागाच्या खार बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते या कामातील एका झडापाची झाकणे बदलण्याचे काम करताना खाडीचे पाणी अडवण्याची कोणतीही तजवीज न करता झडपाची झाकणे काढून टाकल्याने डोंगरे वाडीतील शेतजमिनीत खाडीचे खारे पाणी भातशेती जमीन भागात घुसल्याने सुमारे शेकडो एकर शेतजमीन ही खाऱ्या पाण्यामुळे बाधित झाली आहे. त्यामुळे नापिक होण्याची भिती निर्माण झाली आहे. या भागातील माडबागायतीलाही याचा फटका बसला असून विहिरीचे पाणी दूषित होणार आहे. या मुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतल्याने दाखल झालेल्या खारभूमी व विकास विभाग अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरेवर धरत शेतजमीनचे नुकसान व पिण्याचे पाणी पुढील काही वर्षे पुरवण्याची मागणी लावून धरली. येत्या दोन दिवसात याबाबत तोडगा न काढल्यास कणकवली कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रविवारी सायंकाळी बांधाऱ्याची झडपे बसवण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी झडपे या दिवसात बदलू नका उधाणाची भरती चालू असून झडपे काढल्यास गावात पाणी शिरू शकते यांची कल्पना दिली होती मात्र ठेकेदाराने खाडीचे पाणी अडवण्यासाठी कोणतीही तजवीज न करता झडपे काढून टाकल्याने पाणी वस्ती भागात शिरू लागले होते. सोमवारी पहाटे घरालगतच्या शेतजमीन जलमय झालेली दिसताच ग्रामस्थांनी बांधाऱ्याच्या दिशेने धाव घेतली यावेळी एका झडपाची झाकणे काढून टाकलेल्या अवस्थेत होती. ठेकेदाराला सांगूनही झाकणे काढून टाकल्याने खाडीचे खारे पाणी शेतजमीमिनीत घुसले होते. ठेकेदाराने झडपाची झाकणे काढून टाकल्याने शेतीत पाणी घुसत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ रवी बागवे, रवींद्र राणे, महेंद्र राणे, सुनील दुखंडे, सचिन बागवे, सुजित दुखंडे, संतोष बागवे, प्रफुल्ल आचरेकर, देवेश राणे, संतोष राणे संपदा बागवे, श्रद्धा बागवे, श्रद्धा राणे, प्रगती आचरेकर, संजय आचरेकर, मधुकर बागवे व ग्रामस्थ दाखल झाले होते ग्रामस्थांनी घटनेची माहिती आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांना दिली असता फर्नांडीस व पोलीस पाटील अमोल पेडणेकर यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. दरम्यान कामासाठी दाखल झालेल्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी जाब विचारत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचरण करण्यास सांगितले यावेळी काही तासांनी खारभूमी व विकास विभागाशी अधिकारी अनिल जाधव व इतर अभियंता दाखल झाले यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शेती, शेतजमीन विहिरी यांचे झालेले नुकसान कोण भरून काढणार असा सवाल केला. काही महिला ग्रामस्थांनी तुम्हा अधिकाऱ्यांना सातत्याने सपंर्क केला तर मी विमानाने येऊ का अशी उद्धट उत्तरे तुम्ही देता आणि इथे येऊन क्षमा करा सांगता ही कुठली पद्धत असे ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडीस यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत जोपर्यंत तुमच्या बेफिकीरपणामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या वाडीत पाण्याचे दुर्भीक्ष आहे. होते तेही पाणीबाधित झाले. दोन ते तीन वर्षे पाण्याचा प्रश्न होणार आहे तो कसा सोडवणार हे सांगा अन्यथा तोपर्यंत आपणास हलू देणार नसल्याचा इशारा यावेळी सरपंच यांनी दिला बांधारा दुरुस्तीचे काम चालू आहे कोण येतो आणि काम करून जातो, कोणतातरी ठेकेदार येतो झाकणे हटवतो. जुन्या बांधाऱ्याचे जुने पिचिंग तोडले जाते. गावात काम चालू केले जाते पण ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायतला त्याबाबत विभागाकडून विश्वासात घेतले जात नाही. अशा चालू कामावर आपण कितीवेळा भेट देऊन पाहणी केली असा सवाल ग्रामस्थांनी अधिकारी जाधव यांना केला असता हे काम चालू आहे हे आपल्या माहिती नव्हते, काम चालू करतो असे ठेकेदाराने सांगितले नसल्याचे जाधव यांनी सांगितल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
ग्रामस्थांनी दिला दोन दिवसाचा अल्टीमेटम अन्यथा उपोषणास बसणार
जोपर्यंत डोंगरेवाडी ग्रामस्थांचे खाडीचे पाणी घुसल्याने शेतजमीन आणि पिण्याच्या पाण्याचे नुकसान झाले होते जोपर्यंत नुकसान भरपाई व पिण्याच्या पाण्याची तीन ते चार वर्षासाठीची सोय करून दिली जात नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना जाऊ देणार नसल्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतल्यानंतर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे बैठक घेण्यात आली यावेळी अधिकारी जाधव डोंगरेवाडी ग्रामस्थ तसेच सरपंच जेरोन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, मंगेश टेमकर, जयप्रकाश परुळेकर, जगदीश पांगे, समीर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, चंदू कदम, रुपेश हडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते जोपर्यंत भरपाई व पाण्याची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत न हटण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. शेवटी सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी तुम्हा अधिकारी वर्गाला दोन दिवसाचा वेळ देतो. या दोन दिवसात जर आपण यावर उत्तर नाही दिलेत तर तिसऱ्या दिवशी कणकवलीच्या खारभूमी कार्यालया समोर ग्रामस्थांसमवेत सरपंच आणि सदस्य उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.