तिलारीतील क्रशर काढण्याच्या मागणीसाठी शैलेश दळवी यांचे आंदोलन
क्रशर चालकाला ७ दिवसांत परवाने सादर करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश
✅प्रतिनिधी l दोडामार्ग
तिलारी मुख्य धरणाजवळच्या तिलारी पाटबंधारे महामंडळाच्या जागेवर अनधिकृतपणे बसवलेला क्रशर काढून टाकावा, या मागणीसाठी
उद्योजक शैलेश सुरेश दळवी यांनी कोनाळकट्टा येथील तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १०) आंदोलन केले. त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
तिलारी प्रकल्पाच्या जागेवर कुठलीही परवानगी न घेता तो क्रशर बाबरवाडी रस्त्यालगत उभारण्यात आला आहे .त्यामुळे शैलेश दळवी यांनी आक्षेप घेत १५ ऑगस्टला उपोषणही केले होते. त्यावेळी जाधव यांनी दोन महिन्यात क्रशरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर त्यांनी क्रशर घालणाऱ्या व्यक्तीला दोनवेळा पत्र देऊन तो स्वतःहून काढून टाकावा अशी सूचना केली होती.मात्र त्याने तो क्रशर न काढल्याने दळवी यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी कारवाई करण्यास असमर्थता दर्शवून चेंडू कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या कोर्टात टाकला. त्यांनी बुधवारी ९ रोजी दुपारी दळवी यांच्याशी चर्चा करुन कारवाईचे आश्वासन दिले आणि दुसरीकडे त्याच सायंकाळी त्या क्रशर मालकाकडून जमीन भाडे व अनामत रक्कम घेऊन क्रशर चालविण्यास डिसेंबरपर्यंत परवानगी देऊन टाकली.त्यामुळे आत्मदहनाचा निर्णय घेऊन दळवी सकाळीच कार्यालयात पोचले. शेवटपर्यंत ते आपल्या निर्णयावर ठाम होते. यावेळी शैलेश दळवी यांनी क्रशर बसवण्यास व चालवण्यास आवश्यक असलेले परवाने न घरताच परवाने का दिले असे विचारले. यावेळी जाधव यांनी त्यांनी परवानगी शिवाय क्रशर घातलाच आहे, काढायचे पत्र देऊनही ती व्यक्ती काढत नाही, त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान नको म्हणून आपण भाडे व अनामत रक्कम घेऊन परवानगी दिली असा खुलासा केला. क्रशरला परवानगी द्यावी यासाठी आपल्यावर वरून मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव होता असेही सांगितले.मात्र दळवी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी त्या क्रशर मालकाला क्रशरसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने पत्र मिळाल्यापासून ७ दिवसांत सादर करावे ;अन्यथा परवानगी रद्द करण्यात येईल असे पत्र दिले. त्याची एक प्रत श्री दळवी व पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश गवस, प्रेमानंद देसाई, गोपाळ गवस, संजय गवस, गणपत डिंगणेकर, प्रवीण गवस,रामदास मेस्त्री, अनिल गवस, मायकल लोबो,गजानन बुचडे,सहायक पोलिस निरीक्षक आशिष भगत व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
….म्हणून दिली परवानगी: जाधव
महामंडळाकडील पडीक जागा कुणीही भाडे भरून तात्पुरत्या स्वरूपात वापरू शकतो. या व्यक्तीने तिलारी धरण क्षेत्रात रिंग रोडचे काम करायचे असल्याने खडीसाठी क्रशर आवश्यक आहे असे सांगितल्याने परवानगी दिली असे विनायक जाधव यांनी सांगितले.मात्र, रिंग रोडचे काम करणारा ठेकेदार आणि क्रशरची परवानगी मागणारा यांचा संबंध नसताना परवानगी कशी दिली असा प्रश्न शैलेश दळवी यांनी विचारला.
अँम्युझमेन्ट पार्कच्या जागेत क्रशर कसा? दळवी
मंत्री दीपक केसरकर यांनी धरणक्षेत्रातील व लगतच्या जागेत अँम्युझमेन्ट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून अनेक बेरोजगाराना रोजगार मिळणार आहे. आठवडाभरात त्यासंदर्भात अधिसूचना व निविदा बाहेर पडेल असे मंत्री केसरकर यांनी बुधवारी सांगितले आणि त्याच दिवशी तुम्ही त्याच क्षेत्रात क्रशरला परवानगी देता याचा अर्थ मंत्र्यांच्या शब्दावर तुमचा विश्वास नाही का, असा प्रश्नही दळवी यांनी जाधव यांना विचारला.यावर जाधव यांनी तसे नाही आहे असे उत्तर दिले.