कोलगाव येथील अक्षय साहिल आत्महत्या प्रकरणी प्रशांत पवार याला अटकपूर्व जामीन मंजूर
संशयिताच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव येथील अक्षय जनार्दन साईल याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रशांत सुभाष पवार रा. भोमवाडी, कोलगांव याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सावंतवाडी येथील अजित मठकर यांची गाडी प्रशांत पडते रा. कोलगांव याच्या सांगण्यावरून फिर्यादी जनार्दन साईल यांचा मुलगा अक्षय याने मुंबई येथील काही परवेझ शेख व इतरांना ठरवून दिली होती. तीचा अपघात झाल्याने व इन्शुरन्स होत नसल्याने गाडीचा खर्च देण्यासाठी गाडीमालक अजित मठकर याने सतत अक्षय याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. ७ लाख ८० हजार रुपयांपैकी ५ लाख ३० हजार गाडी मालकाला मिळाले होते. उर्वरीत २ लाख ५० हजार येणे बाकी असल्याने त्याने अनेकदा अक्षय याला फोनकॉल केले होते. पैसे देण्याची जबाबदारी परवेझ शेख व पडते यांनीही नाकारली होती. त्यामुळे अक्षय तणावमध्ये होता. ३ सप्टेंबर २०२४ रोजी अक्षयला अजित मठकर, प्रशांत पवार, संकेत माळी व शामू साळगांवकर यांनी मारहाण केली होती. त्या तणावाखाली अक्षयने माडखोल धरणात आत्महत्या करून आरोपींची नावे लिहून ते आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील ५ जणांना अटक झाली होती. यापैकी प्रशांत पवार याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला २५ हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर करताना न्यायालयाने त्याला तपासात सहकार्य कारावे, तपासात हस्तक्षेप करू नये, आदीं घातल्या आहेत.
दिगंबर वालावलकर/ कणकवली