कुडाळमध्ये २८ ला गिरणी कामगार आणि वारसदार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत घरे नाकारणारे १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयामधील कलम १७ रद्द करण्यात आपण यशस्वी झालो. आता मुंबईतल्या   घरांकरीता आंदोलनबाबत शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी बॅ नाथ पै विद्यालय, कुडाळ येथे सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्यावतीने गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सर्व श्रमिक संघटनेचे संघटक शांताराम परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री परब यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ मार्च, २०२४ रोजीचा शासन निर्णय काढून गिरणी कामगारांच्या घरांकरीता आता मुंबईत जागा नाही. त्यामुळे गिरणी कामगाराना मुबईपासून १०० कि.मि. अंतरावर शेलू / वागणी येथे घरे देण्याचे सांगून मुंबईतून हद्दपार करण्याच्या निर्णय घेतला होता. त्याविरूद्ध सर्व श्रमिक संघटनेसह १४ कामगार संघटना एकत्र येवून “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती’ स्थापन केली व मुंबईत घरे या या मागणीकरीता ९ जुलै २०२४ रोजी मुंबईत गिरणी कामगार व वारसांचा प्रचंड मोर्चा काढला. त्याच्या परिणामी १० जुलै, २०२४ रोजी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात सर्व संघटनांची बैठक घेवून गेलू वांगणीचे घर नाकारणाचा घरांचा हक्क हिरावून घेणारे शासन निर्णयातील अन्यायकारक १७ वे कलम रद्द करण्याचे तसेच एन.टी.सी. गिरण्यासहीत मुंवईतच इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु मधल्या काळात सुधारीत शासन निर्णय काढून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. परिणामी ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आश्वासनाची आठवण करून देण्याकरीता या उपमुख्यमंत्री यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी गिरणी कामगार व वारसांनी “आठवण मोर्चा काढला. यानंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी सुधारीत शासन निर्णय काढून मुंबईतून गिरणी कामगारांना हद्दपार करणारे १७ वे कलम रद्द झाले, पण मुंबईत घरे देण्याबाबत कालबद्ध धोरण जाहीर करण्याच्या आश्वासनाची अद्याप पुर्तता झालेली नाही.
आता मुंबईतच घराचा हक्क मिळविण्यासाठी शनिवार,  २८ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने गिरणी कामगार आणि वारसदारांचा मेळावा बॅ. नाथ पै विद्यालय, लक्ष्मी वाडी, कुडाळेश्वर मंदिराजवळ कुडाळ येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी क्रॉ उदय भट, कॉ. वी. के. आंबे, कॉ. विजय कुलकर्णी  संतोष मोरे सखाराम महाडिक,  दगडुबुवा यादव, तुकाराम निकम आदी मुंबईहून उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!