देवगड तालुक्यातील जि. प. च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

आज दुपारची धक्कादायक घटना
पालक संतप्त, शिक्षणाधिकारी कारवाई करणार काय?
देवगड तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या “बाजारा” लगतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधील तिसरी व चौथी मधील काही मुलांना येथील एका तात्पुरत्या कामगिरीवर असलेल्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या तात्पुरत्या कामगिरीवर असलेल्या शिक्षकाने या मुलांच्या हातांवर व पायावर लाकडी पट्टीने मारहाण केल्याचे वळ देखील उशिरापर्यंत मुलांच्या अंगावर दिसत होते. शाळेतील वर्ग खोलीमध्ये मुलांना घालून या मुलांना मारहाण केल्याची माहिती मुलांनी पालकांना दिली. या घटनेने पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून शाळेतील पटसंख्या ही बऱ्यापैकी आहे. असे असताना शाळेतील शिक्षक हे सुट्टीवर असल्याने कामगिरीवर या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती अशी माहिती पालकांकडून देण्यात आली. दरम्यान या प्रकरणी त्या शिक्षकाने केलेले कृत्य हे धक्कादायक असून पालकांनी या प्रश्नी आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकाराने मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग