समीर नलावडे यांनी स्वखर्चाने करून दिली कणकवलीतल्या रस्त्याची डागडुजी
नागरिकांमधून व्यक्त करण्यात आले समाधान
शहरातील मधलीवाडी नजीक सुतारवाडी येथील कच्चा रस्ता पावसामुळे अधिक खराब झाला होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना चालणेही कठिण झाले होते. याबाबत रहिवासीयांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे रस्त्याच्या या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. त्यांनी तातडीची गरज ओळखून स्वखर्चाने या रस्त्यावर खडी पसरवून जेसीबीद्वारे रस्त्याची डागडुजी करून दिली. तसेच या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणही लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
सुतारवाडी येथे नव्याने झालेल्या वसाहतीमधील नियोजीत रिंगरोड व अंतर्गत रस्ता पावसामुळे खराब झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या कणकवली येथील जत्रोत्सवावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सुतारवाडी येथील या कच्च्या रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली होती. यावेळी या रस्त्यावर माती टाकण्यात आली होती. मात्र, या पावसाळ्यात मातीमुळे रस्ता चिखलमय होऊन वाहन चालविणे अथवा चालणेही कठिण झाले होते. रस्त्याच्या या स्थितीबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना कळविण्यात आले होते. त्यांनी याची दखल घेऊन या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, तोपर्यंत तेथील रहिवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी स्वखर्चाने तातडीने खडी टाकून जेसीबीद्वारे रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून दिली. लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. नलावडे यांनी केलेल्या या कार्याबद्दल तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
कणकवली, प्रतिनिधी