गेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

नगरपंचायत च्या कृत्रिम धबधब्याचे काम देखील अंतिम टप्प्यात

कणकवलीच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा मार्गी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे विशेष प्रयत्न

जानवली नदीपात्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे. त्‍यामुळे जानवली, कणकवली वासीयांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्‍ध झाला आहे. अवघ्या तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण झाले. तर गेले महिनाभर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याचे काम सुरू होते.
कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रातील मोठ्या पुलाच्या बांधकामला ९ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. तर जून महिन्याच्या पहिल्‍या आठवड्यात या पुलाचे गर्डर आणि स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले. त्‍यानंतर सतत पावसाचा अडथळा येत असल्‍याने दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याचे काम रखडले होते. मात्र गेल्‍या दोन दिवसांत हे काम पूर्ण झाले. त्‍यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.
जानवली पुलासाठी राज्‍य शासनाने हिवाळी अधिवेशनात ८ कोटी ८ लाखांचा निधी मंजूर केला. तर ९ मार्च रोजी पुलाचा कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. त्‍यानंतर ठेकेदाराने दिवसरात्र काम सुरू ठेवून अवघ्या तीन या पुलाचे काम पूर्ण केले. जानवली नदीपात्रात उभारणी झालेला हा पूल ८० मिटर लांब आणि ११.६७ मिटर रूंदीचा आहे. या पुलावर पादचाऱ्यांना जा-ये करण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र ट्रॅक ठेवण्यात आला आहे.
जानवलीसह साकेडी, करूळ आदी गावांना कणकवलीत येण्यासाठी मुंबई गोवा राष्‍ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग होता. तसेच कणकवली शहरवासीयांनाही जानवली तसेच लगतच्या गावात जाण्यासाठी महामार्गावरूनच जावे लागत होते.आता जानवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवाशांना जवळचा आणि नवा मार्ग खुला झाला आहे. या कामाकरिता कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी विशेष लक्ष देऊन हे काम मार्गी लावून घेतले. त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरू शकले.
नव्या जानवली पुलापासून काही अंतरावर शहराचा रिंगरोडचे दोन टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. तर तिसरा टप्पाही पुढील दोन वर्षात पूर्णत्‍वास जाणार आहे. त्‍यामुळे संपूर्ण शहरवासीयांनाही जानवली नदीपात्रातील नव्या पुलाचा वापर करता येणे शक्‍य होणार आहे. नव्या जानवली पुलालगत कणकवली नगरपंचायतीतर्फे कृत्रिम धबधब्‍याची उभारणी केली जात आहे. यात पाणी साठवण टाकी आणि शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित झाल्‍यानंतर येथील धबधबाही सुरू होणार असल्‍याने शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनातही भर पडणार आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!