रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने नै.प.सं आणि मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग,शाखा-कणकवली च्या “वृक्ष बँकेस” 1000 झाडे प्रदान.
संस्थेच्या वृक्ष बँकेतून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत वृक्षांचे वाटप.
कणकवली/मयुर ठाकूर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था,शाखा-कणकवलीच्या वतीने जिल्ह्यातील पहिली “वृक्ष-बँक” स्थापन करण्यात आली.या वृक्ष बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारची झाडे जिल्ह्याभरात वितरित करण्यात येत आहेत.
नुकताच कणकवली येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशाला वरवडे येथे “रोटरी क्लब ऑफ कुडाळ” तसेच आयडियल प्रशाला आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरणाचा भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला.संस्थेच्या शाखा-कणकवली येथील वृक्ष-बँकेस रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्यामार्फत तब्बल 1000 झाडे प्रदान करण्यात आली.यामध्ये आंबा कलम,काजू कलम,चिकू कलम,नारळ सुपारीची झाडे,तसेच नारळ झाडे,कोकम कलम अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश होता.नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास या संस्थेचे देशभरातील कार्य पाहून “रोटरी क्लब ऑफ कुडाळ” यांच्या माध्यमातून ही झाडे संस्थेच्या वृक्ष बँकेस देण्यात आली.यानंतर संस्थेच्या या वृक्ष बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रत्येकी 100 झाडे अशा आठशे झाडांचे वितरण करण्यात आलं.
या वृक्ष वितरणाच्या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब चे असिस्टंट गव्हर्नर आणि ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळचे प्रेसिडेंट डॉ.संजय केसरे,माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर,माजी असिस्टंट गव्हर्नर शशी चव्हाण आणि माजी असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे हे उपस्थित होते.त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप सावंत सर तसेच महिला अध्यक्ष सौ.पूजा गावडे, जिल्हा संघटक पंढरी जाधव,मालवण तालुका अध्यक्ष श्री.सावंत तसेच संस्थेचे देवगड येथील काही पदाधिकारी,माध्यमिक विद्यामंदिर कणकवली प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.पी जे कांबळे सर आणि नाटळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बांबुळकर मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल,संस्थेचे सल्लागार श्री डी.पी तानवडे, आयडियल प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था शाखा-कणकवली यांच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर कणकवली या प्रशालेला विविध प्रकारची 50 झाडे तसेच माध्यमिक विद्यालय नाटळ येथे देखील 50 वृक्षांचे वाटप करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक श्री.पंढरी जाधव आणि कणकवली तालुका युवाध्यक्ष मयुर ठाकूर यांनी मेहनत घेतली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयडियल प्रशालेचे शिक्षक श्री. पाटकर सर यांनी केले.