लोकसभेपाठोपाठ पदवीधर निवडणुकीत देखील पैशांचे वाटप

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप

सुशिक्षित, पदवीधरांनी पैसे घेऊन मतदान करणे हे लांछनास्पद

लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोकण पदवीधर साठी पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार पुढे येत आहेत. पदवीधर, सुशिक्षित, बेरोजगार मतदार यांनी पैसे घेऊन मतदान करणे लांछनास्पद असून लोकशाही अधोगतीकडे नेण्याचाच हा प्रकार असल्याची खंत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण पदवीधर मतदार संघासाठी मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून आला. मुळात अशाप्रकारे पैसे वाटणे म्हणजे मतदारांचा अवमान आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ही मंडळी पैसे वाटत असून पैसे घेणे व देणे ही लोकशाहीच्या दृष्टीने शोकांतिका आहे.
साधारण कडून अशा प्रकारे पैसे वाटून मते मिळविली जात असतील तर कधीही पैसे न घेता मतदान करणाऱ्या सर्वसामान्यांनी यातून काय बोध घ्यावा? असा सवाल ही श्री उपरकर यांनी केला आहे. तसेच अशाप्रकारे पैशाने निवडणुका जिंकता येऊ लागल्या तर भविष्यात देशांमध्येही पक्ष बाजूला राहून मोठमोठे उद्योगपती आपले उमेदवार उभे करून पैशाने निवडणुका जिंकतील व त्यातून लोकशाही धोक्यात येईल.
आज पदवीधर असतील किंवा सुशिक्षित बेरोजगारही पैसे घेऊन मतदान करतील. मात्र त्यांना हे कळत नाही आहे की जे लोकप्रतिनिधी पैसे देऊन निवडून येणार आहेत ते उद्या विकास कामे काय करणार. पुढील काळात या लोकप्रतिनिधींकडे विकास कामांचे मुद्देही घेऊन हे मतदार जाऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हा सारा प्रकार म्हणजे लोकशाही अधोगतीकडे जाण्याचे लक्षण असून मतदारांनीच याबाबतचा निर्णय घेऊन अशा प्रकारे पैसे वाटून विजयी होण्याचा जो पांडा पडत आहे तो कायमस्वरूपी नेस्तीनाबुत करण्याची गरज असल्याचे ही श्री उपरकर यांनी म्हटले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!