सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत ; अन्यथा आंदोलन

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या बैठकीत निर्णय


आचरा–अर्जुन बापर्डेकर

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याची एकत्रित बैठक सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांना संघाच्या इमारतीच्या सभागृहात प्रकाश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे समोर आले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या जिल्हा कार्यकारिणीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, दिलेल्या मुदतीत प्रशासनाकडून सदर प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

या सभेस जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे, मधुकर घाडी, संतोष जाधव, एस. बी. पेडणेकर, रामा ठाकूर, एन. यु. राऊळ, व्ही. आर. राऊळ, ए. आर. वारंग, विष्णू चराटकर, सत्यविजय सावंत, आर. आर. सावंत, नारायण धुरी, मनोहर वेंगुर्लेकर, विष्णू धुरी, प्रमोद तोरसकर, गोकुळदास शिरसाट, संदिप बांदेकर, रामचंद्र कोचरेकर, एस. एस. मोरे आदी सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रारंभी निधन झालेल्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना तसेच वाय. जे. फणसळकर यांच्या पत्नीस श्रद्धांजली वाहण्यात आली. सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गला धर्मादाय आयुक्त यांची अधिकृत नोंदणी मिळाली आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्षानी सभागृहाला दिली. संघटना अधिकृत झाली असल्याने सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला. सेवानिवृत्त झालेल्या सर्व ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे यावेळी ठरविण्यात आले.

या बैठकीत सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे चर्चेच्या अनुषंगाने समोर आले. पेन्शन उशिरा जमा होणे, आश्वासित योजनेची प्रकरणे प्रलंबित ठेवणे, रजा रोखीकरण, आदर्श ग्रामसेवक वेतन वाढ, १५ वर्षानंतर पूर्ण पेन्शन न मिळणे, ८० वर्षानंतर २० टक्के पेन्शन वाढ, सेवापुस्तके गहाळ होणे, पेन्शनरांच्या पश्चात त्यांच्या अविवाहित अगर अपंग मुलींना पेन्शन न मिळणे, बक्षीस समिती नुसार विस्तार अधिकारी पदाची वेतनश्रेणी ग्राम विकास अधिकारी यांना लागून करणे, अशा प्रकारची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले. तसेच ग्रा. वि. अधिकारी श्री. बांदेकर यांची पेन्शन केस प्रलंबित असून नियमित पेन्शन मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सर्व प्रश्नांवर यावेळी चर्चा करून जिल्हा कार्यकारिणीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे यावेळी ठरविण्यात आले.

error: Content is protected !!