विनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही -परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप: आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गमधून रोज सुमारे १०० डंपरची अवैध वाळू वाहतूक गोव्याकडे वाहतूक होते. यासाठी खोटे पास वापरण्यात येत आहेत. तसेच विनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. वास्तविक, पोलीस, आरटीओ व महसूलच्या भरारी पथकाकडून कारवाई होणे आवश्यक असताना केवळ हप्तेबाजीपोटी कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. तसेच या प्रकाराबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, जिल्हयात सर्वच ठिकाणी महसूल विभागाचा अंदाधुंद कारभार सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अवैध पासवर सिलिका वाहतूकीबाबत तक्रार करूनही पुढे काय झाले ते समजले नाही. आताही अशाच प्रकारे गोव्याच्या दिशेने रोज रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. यात अनेक गाड्या ओव्हरलोड असूनही कारवाई होत नाही. अशाच प्रकारे एक गाडी आमच्या कार्यकर्त्यांनी अडविली असता, चालकाने पास असल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांनी पासचा फोटो घेतला व त्यानुसार आम्ही खनिकर्म विभागाकडे चौकशी केली असता, असा कोणताही पास दिलेला नाही तसेच आंबेरी येथे वाळूचा २०२३-२४ सांठीचा कोणताही लिलावही झालेला नसल्याचे सांगितले. याचाच अर्थ जिल्हयातून मोठ्या प्रमाणात अवैध मात्र, त्याबाबत भरारी पथकांकडून कोणतीही कारवाई होत नाही. तसेच गोव्याहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून माल वाहतूक केली जाते. जीएसटी चूकवून ही माल वाहतूक होत असून जीएसटी विभागाला आपण याबाबत पत्र दिले असल्याचे उपरकर म्हणाले. वाळूची वाहतूक गोव्याकडे सुरू आहे. आम्ही आरटीओकडे तक्रार, आंदोलन केल्यानंतर आरटीओ विभागाने दोन दिवसांत साडेपाच लाखांचा दंड वसूल केला. याचाच अर्थ शासनाचा महसूल बुडवून किती पैसा खिशात जातो हे यातून दिसून येते. परंतु, आरटीओ विभागाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आज जिल्ह्यात प्रांत, तहसीलदार यांच्या देखरेखीतच अवैध वाळू वाहतूक होत नाही. पोलीस यंत्रणेकडून मदत घेतली जात नाही. अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे आरटीओ व महसूल विभागाच्या या कार्यपद्धतीविरोधात पावसाळी अधिवेशनावेळी आम्ही आंदोलन छेडणार असल्याचे उपरकर म्हणाले

error: Content is protected !!