भूमी अभिलेख कार्यालयात अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करा…
सीताराम कदम; जिल्हा भूमी अभिलेखांकडे निवेदनाद्वारे मागणी…
भूमी अभिलेख कार्यालयात केलेल्या अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सरंबळ
कदमवाडी येथील सीताराम कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या तक्रार अर्जात सीताराम कदम यांनी, कुडाळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी अर्ज सादर होत नाहीत. नकाशासाठी अर्ज केल्यास त्याची पोहोच मिळत नाहीत. नकाशा मागणी अर्जच गहाळ होतात. त्याची पोहोच मिळत नसल्याने परत नव्याने अर्ज करावे लागतात. हे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आर्थिक खर्चाचे आणि मानसिक त्रासाचे ठरत आहे. ही जनतेची अडवणूक आहे. त्यामुळे यात आपण
जातीनिशी लक्ष घालावा. तसेच दप्तर व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एखाद्याने अर्ज केल्यावर विहित मुदतीत अर्ज मिळणे अपेक्षित असते. परंतु पोहोच पावतीच मिळत नाही. त्यामुळे पोहोच पावती देवून त्यावर नक्कल मिळण्याची तारीख टाकावी. तसेच अर्ज प्राप्तीच्या क्रमावारीनुसार त्या त्या तारिखला कागदपत्र उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करावी. धनदांडगे लोक आर्थिक हात मिळवणी करून कागदपत्र तातडीने प्राप्त करून घेतात. गरीब शेतकरी लांबून येवूनही त्याला वेळेत कागदपत्र मिळत नाहीत. ही नित्याची बाब झाली आहे, तरीही आपल्या स्तरावरून या व्यवस्थेत बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.