कणकवलीतील जानवली कृत्रिम रेतन केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामात भ्रष्टाचार!
निकृष्ट कामाबाबत चौकशी करून कारवाईची मागणी
मुख्यमंत्री लोकाभिमुख काम करत असताना ठेकेदार व प्रशासनामुळे सरकारची बदनामी
कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली कृत्रिम रेतन केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी राज्य सरकार च्या निधीतून दवाखाना परिसरातील रस्ते व अन्य विकास कामांकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र हा निधी निव्वळ ठेकेदाराला पोसण्यासाठी वापरण्यात आल्याची स्थिती जाग्यावर दिसून येत आहे. तसेच कृत्रिम रेतन केंद्राच्या स्टिक साठवणुकी करता या ठिकाणी एक अदययावत इमारत देखील उभारण्यात आली आहे. या इमारतीचा पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामकाजाच्या अनुषंगाने असा वापर करण्याचे उद्दिष्ट असताना या इमारतीचे काम देखील निकृष्ट दर्जाचे व बोगस झाल्याची तक्रार शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी केली आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, या निकृष्ट कामामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदाराच्या घशात घातला गेला आहे. कृत्रिम रेतन केंद्राच्या इमारती नजीक नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती ला वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट व बोगस दर्जाचे असून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच एवढे करून सदर ठेकेदार थांबलेला नाही. तर या ठिकाणी केलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम देखील पूर्णपणे बोगस व निकृष्ट केले आहे. डांबरीकरणाच्या कामांमधील बीबीएम, कार्पेट, सिलकोट चा दर्जा मेंटेन करण्यात आलेला नाही. तसेच संपूर्ण कामाला डांबराचा अत्यल्प वापर करून निधी लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब गंभीर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार लोकाभिमुख काम करत असताना अशा ठेकेदारांमुळे सरकार व प्रशासन बदनाम होत आहे. आपले काही अधिकारी ठेकेदाराच्या पाठीशी असल्याचे समजत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी होऊन ठेकेदारासह संबंधित दोषी अधिकाऱ्यावर देखील कडक कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. या मगणी नुसार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दक्षता व गुण नियंत्रक मंडळ कोकण भवन च्या अधीक्षक अभियंत्यांना सदर कामाचे गुण नियंत्रण तपासणी करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नसल्याने येत्या दोन दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा श्री परुळेकर यांनी दिला आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली