मोदी आणि राणे हे कोकणच्या विनाशाचे कॉम्बिनेशन

मायनिंग, अणुऊर्जा आणि रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना भाजपची उमेदवारी

आमदार वैभव नाईक यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

दोन दिवसांपुर्वी राजापुरच्या सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी आणि राणे म्हणजे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन असे वक्तव्य केले होते पण प्रत्यक्षात मोदी व राणे हे कोकणच्या विनाशाचे कॉम्बिनेशन ठरणार आहे, असा पलटवार आमदार वैभव नाईक यांनी केला. कोकणच्या निसर्गरम्य परिसरात भाजपला रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प आणुन इथल्या पर्यावरणाचा विनाश करायचा आहे. कोकणचा केमिकल झोन करायचीच भाजप नेत्यांची इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प राजापूर तालुक्यात आणला. नारायण राणेंनी सुरुवातीला रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. आमदार नितेश राणेंनी रिफायनरी विरोधात मंदिरात घंटानाद आंदोलन केले आणि मोर्चे देखील काढले. शेवटी भाजपने हा महत्वाकांक्षी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना राज्यसभेतुन खासदारकी बहाल केली. भाजपकडून खासदारकी मिळताच नारायण राणेंना एकाएकी रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणचा विकास होईल असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी पुर्णपणे यु-टर्न घेऊन स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात रेटण्यासाठी ते सज्ज झाले. अशा प्रकारे राज्यसभेच्या खासदारकीसाठी नारायण राणेंनी कोकणी जनतेसोबत बेईमानी केली. त्यानंतरही रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यांनी आपल्या परीने रिफायनरी प्रकल्प रेटायचा पुरेपुर प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिल्यामुळे राणेंना रिफायनरी प्रकल्प रेटणे शक्य झाले नाही. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिसे यांचा खुन करण्यात आला. त्यांच्या खुनाचा सुत्रधार असलेला दलाल पंढरीनाथ आंबेरकर हा नारायण राणेंचाच कार्यकर्ता आहे आणि पत्रकार वारिसे यांच्या गाडीचा अपघात करण्यापूर्वी चार दिवस अगोदर त्याने सिंधुदुर्गात आंगणेवाडी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भाजपच्या मेळाव्यात नारायण राणेंची भेट घेतली होती. विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराचा खुन करून हे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न नारायण राणेंनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यामार्फत केला. मात्र तरीही प्रकल्पस्थळी झालेल्या मातीपरीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला. त्याठिकाणी ग्रामस्थांवर पोलीसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले. त्यात अनेक ग्रामस्थांना दुखापत झाली तरीही ते गोरगरीब ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनात अशाच प्रकारे पोलीसांकरवी गोळीबार करून प्रकल्पाला विरोध करणाऱ्या तबरेज सायेकरचा बळी घेणारे तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणेच होते. त्याअगोदर कळणे मायनिंग प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात नारायण राणेंनी आपल्या पालकमंत्री पदाचा गैरवापर करून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांकरवी दडपशाही केली होती, त्यांच्यावर खुनाचे खोटे गुन्हे दाखल केले आणि पर्यावरण रक्षणासाठी उभारलेले आंदोलन मोडीत काढले. आपल्या खासदारकीच्या आणि केंद्रीय मंत्रीपदाच्या स्वार्थासाठी विनाशकारी प्रकल्प रेटू पाहणारा आणि त्यासाठी प्रसंगी कोकणच्या लोकांवर गोळीबार करून त्यांचे बळी घेण्याची मानसिकता असलेला नारायण राणेंसारखा क्रूरकर्मा कोकणच्या राजकारणात कुठेही शोधुन सापडणार नाही, याची भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पुरेपुर जाणीव आहे. त्यासाठीच कोकणच्या मुळावर येतील असे विनाशकारी प्रकल्प रेटण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मोदी व राणे हे कोकणच्या विकासाचे नव्हे तर इथल्या पर्यावरणाच्या विनाशाचे कॉम्बिनेशन आहे.

गेली तीन वर्षे नारायण राणे केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री या पदावर कार्यरत होते. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात नारायण राणेंनी कोकणातील जनतेसाठी नेमके काय दिवे लावले, सर्वप्रथम त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील जनतेला द्यावी. नारायण राणेंच्या तीन वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात किती उद्योग आले…? त्यातून किती लोकांना रोजगार मिळाला…? त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात दोन्ही जिल्ह्यात एकही उद्योग ते उभारू शकले नाहीत. त्याअगोदर ते पाच वर्षे राज्याचे उद्योगमंत्री म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते साधा एकही कारखाना उभारू शकले नव्हते. नारायण राणेंनी आपल्या पदाचा वापर कधीही कोकणात नवीन उद्योग आणण्यासाठी केला नाही. त्याउलट अणुऊर्जा, मायनिंग आणि रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प रेटण्यासाठीच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केला. ज्या झाडाला वर्षानुवर्षे खत पाणी घालूनही गोड फळ येत नसेल तर असे वांझोटे झाड मुळासकट तोडायचे असते, याची कोकणातील जनतेला पुरेपुर जाणीव आहे. नारायण राणेरुपी झाडाला कोकणातील जनतेने नेहमीच प्रेमाने खत-पाणी दिले पण या झाडाला मायनिंग, अणुऊर्जा, रिफायनरी अशी विषारीच फळे लागली. कोकणच्या विकासाशी नारायण राणेंचा दूरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे विषारी फळांची पैदास करणारे हे झाड कोकणी जनता मुळापासून तोडून टाकणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत विनाशकारी प्रकल्प रेटुन पर्यावरणाचे लचके तोडू पाहणाऱ्या नारायण राणेंचा इथली पर्यावरणप्रेमी जनता मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!