रेल्वे स्टेशन बाहेर कोट्यावधींचा निधी खर्च मात्र रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मवर छप्परच नाही!

कणकवली रेल्वे स्टेशन वरील गेले अनेक वर्षांचा हा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावणार का?
उन्हाळा व पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास
कोकण रेल्वेच्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागाचे सुशोभीकरण व शेड सह अन्य अनेक कामे सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. मात्र एकीकडे कोकण रेल्वे स्टेशनच्या बाहेर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना कणकवली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या डोक्यावरती मात्र प्लॅटफॉर्मवर पूर्ण पणे छप्पर नसल्याने सध्या उन्हाच्या कडाक्याने रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सरकारचे प्रतिनिधी व कोकण रेल्वे प्रशासन यांना दिसत नाही का? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. कोकण रेल्वे च्या कणकवलीतील दोन्ही प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे छप्पर नसल्याने पावसाळ्यात देखील रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सातत्याने समोर येत असताना देखील सातत्याने हा प्रश्न आमदार, खासदार, मंत्री डोळेझाक करत असल्याने याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी इतर कामे करत असताना प्लॅटफॉर्मवर आवश्यक असणारे छप्पर प्रवाशांच्या दृष्टीने सोईस्कर व महत्त्वाचे आहे. सध्या कडाक्याचा उन्हाळा असताना या उन्हाच्या झळा सोसत प्रवाशांना थांबावे लागत आहे. प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या प्रवासी निवारा शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी मुबलक जागा होत नसताना, प्रवासी उन्हात ताटकळत थांबत असतात. अशावेळी राज्यकर्त्यांच्या ही बाब निदर्शनास येत नाही का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन असताना या रेल्वे स्टेशनच्या बाबतीत ही उदासीन भूमिका नेमकी केव्हा दूर होणार? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रश्नी सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावा अशी देखील मागणी जनतेतून केली जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





