शिक्षणप्रेमी उभादांडावासियांचा येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात विद्यार्थ्यांचे शाळेसाठीच्या रस्त्याविना हाल

राज्याचे शिक्षणमंत्री आणि आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावातील शेकडो लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा मोठा निर्णय घेतला आणि त्या सबंधीचे निवेदन आणि समर्थनार्थ शेकडो मतदारांच्या सहीचे पत्र दिनांक २६ एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांना देण्यात आले.

वेंगुर्ला तालुक्यातील, उभादांडा या गावात असलेल्या आणि १९६३ साल पासून अस्तित्वात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा या एकमेव माध्यमिक शाळेत आजमितीला उभादांडा गावातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेली १६-१७ वर्षे शालांत परीक्षेला शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे आणि गावाचा नावं लौकिक वाढवला आहे. रेडी रेवस राज्यमहामार्गपासून अवघ्या ऐशी मीटर अंतरावर असलेल्या या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना सन २०२० पर्यत पुरेसा रस्ता शाळेत जाण्यायेण्यासाठी उपलब्ध होता. मात्र कोविड काळात शाळा बंद असल्याची संधी साधून काही समाज कंटकांनी या जाण्या- येण्याच्या संपूर्ण रस्त्यावर झाडांची लागवड करून आणि बेकायदेशीर बांधकामे करून तसेच सांडपाण्याचा चिखल करून गावातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास देण्याचा जणू विडाच उचलला आहे.

या बेकायदेशीर कृत्याविरोधात शाळा संस्थेने सावंतवाडी प्रांत कार्यालयात केलेला अर्ज अजून निकाली काढला गेला नाही. शाळेने वेळोवेळी पोलीस प्रशासन, तहसीलदार, स्थानिक आमदार आणि विद्यमान शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर, तत्कालीन पालकमंत्री श्री. उदय सामंत, विद्यमान पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण, विद्यमान खासदार श्री विनायक राऊत यांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि तक्रारीकरुन सुद्धा कोणतीही कारवाई प्रशासनाकडून किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून करण्यात आलेली नाही. अशा परिस्थिती मध्ये आज रोजी मुलांना त्याचं झाडी झुडूपातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये शाळेत जाताना मुलांना इजा होण्याची तसेच त्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज रोजी येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मुलांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना आणि ध्वजरोहणासाठी सन्मानाने शाळेत जाणेसुद्धा मुश्किल होऊन बसले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे उभादांडा गावात आणि पर्यायाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्याय आणि प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

याच प्रश्नाची दखल प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी या मागणीसाठी उभादांडा गावातील या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि संपूर्ण गावातील शिक्षणप्रेमी जनतेने आज शेकडो सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना सादर केले.

या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागून येत्या १ मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध न झाल्यास दिनांक ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या येत्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्णय या निवेदनाच्या पत्रातून जिल्हा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी यांना कळविण्यात आला आहे.

देशाचे माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री सुरेश प्रभू यांनी प्रत्यक्ष भेट दिलेल्या आणि गौरविलेल्या या शाळेतील मुलांची गैरसोय १ मे च्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी दूर करून जिल्हाप्रशासन आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उभादांडा गावच्या शिक्षणप्रेमी जनतेला न्याय देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Content is protected !!