शक्तिपीठ महामार्गच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांची सावंतवाडीत बैठक
सावंतवाडी- नागपूरहून निघणारा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेरले, पारपोली, फनसवडे, असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा असा जाणार आहे. या सहापदरी महामार्गामुळे तालुक्यातील हजारो एकर जमीन जाणार असून पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे. मुळात आपला तालुका हा पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील पट्ट्यात येतो असे असताना हा महामार्ग कशासाठी असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कोल्हापूर सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर येथील शेतकरी महामार्ग विरोधी लढ्यात मोठ्या संख्येने उतरले आहेत. या महमार्गाने बाधित होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यापक बैठक शुक्रवार दि २६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मध्यवर्ती कारागृहाजवळ सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते संपत देसाई, अंकुश कदम, प्रकाश मोरुस्कर हे उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यतील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक राजेंद्र कांबळे यांनी केले आहे