पाच वर्षे मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही, तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत – सुनिल तटकरे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे दिनांक २६ एप्रिल रोजी जाहीर सभा;सुनिल तटकरे यांची माहिती…

रोहा – अनंत गीते तुम्ही नशीबवान आहात मोदींच्या मंत्रीमंडळात तुम्हाला अवजड की अवघड खाते मिळाले. त्याचे महत्व तुम्हाला कधी कळलेच नाही. पाच वर्षांत तुम्ही मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर रोहा येथे केला.

बुधवारी रेवदंडा येथे महायुतीच्यावतीने कोळी महासंघाची जाहीर सभा झाल्यानंतर रोहा येथे दुसरी सभा पार पडली.

अपयश जेव्हा पचवता येत नाही त्यावेळी आत्मपरीक्षण करायचे असते असा सूचक इशारा सुनिल तटकरे यांनी विरोधकांना दिला.

४० वर्षांत विकास हेच ध्येय ठेवून जनसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेत आलो आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत विकास हेच ध्येय घेऊन काम करत राहणार असून त्यामुळेच तुम्ही मला लाखोंच्या फरकाने विजयी कराल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

देशाच्या हितासाठी… राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत…’घड्याळ तेच वेळ नवी’ आहे असेही सुनिल तटकरे यांनी ठणकावून सांगितले.

घटना बदलली जाणार असा अभास निर्माण करण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांकडे सध्या आहे.शेकाप हा एक छोटासा पक्ष पण जणू काही हाच भावी पंतप्रधान करणार अशी हाव दिसते असा टोला लगावतानाच इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि त्यांनी जाहीर केला तर आघाडीचे तुकडे झालेले पहायला मिळतील असा दावा सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.

पेण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक २६ एप्रिल रोजी जाहीर सभा होत असून महायुतीच्या नेत्यांची ही माझ्या मतदारसंघातील पहिलीच जाहीर सभा होणार आहे. या सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आहे.

मुंबई महानगरपालिका म्हणजे उबाठाचा आत्मा आहे. मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो तसा मुंबईमध्ये महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्यावर तशी होणार आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

या महायुतीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!