राणें सारखा “दमदार” खासदार या मतदारसंघातून निवडून आल्यास विकासाची गंगा येईल!
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचे प्रतिपादन
कणकवलीत महायुतीच्या बैठकीत केले मार्गदर्शन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसारखा दमदार खासदार इथून त्यांच्या सोबत असेल तर या मतदारसंघात विकासाची गंगा गतिमान होईल. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी बाकावरच मोदींसोबत काम करणारा आपला खासदार येथील जनता निवडून देईल असा, विश्वास भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी खा. निलेश राणे,आमदार नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, सिंधू – रत्न समितीचे सदस्य किरण सामंत, माजी आ. अजित गोगटे, मा. आ. राजन तेली, माजी आमदार बाळ माने, जिल्हा बँक अध्यक्ष मनीषा दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, आरपीआयचे रमाकांत जाधव, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, रुपेश पावसकर,भाजपाचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राष्ट्रवादीचे सावळाराम अनावकर गुरुजी, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, भाजप प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अमोल तेली, नासिर काझी, शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, एम. एम. सावंत तसेच जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पुढे श्री. तावडे म्हणाले, ज्या काँग्रेसने ८० वेळा घटना बदलली. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा मधून तिकीट देऊन पाडले. त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही. आम्ही चारशे पार ची घोषणा करतो. कारण देशाला विकसित देश करायचे आहे. देशाला २०४७ पर्यंत एका वेगळ्या स्थानावर न्यायचे आहे. देशातील गरीब, दलित, वंचित अशा सर्व समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाण्यासाठी ४०० पारचा आकडा आम्हाला पूर्ण करायचा आहे असे ते म्हणाले.
पुढील पाच वर्षांच्या कालावधीत गरीब, शेतकरी, युवक, महिला अशा सर्वच स्तरावर मोठे काम करत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे आहे. स्पेस मध्ये अंतराळात जाण्याबाबतच्या गोष्टी पूर्ण करावयाचे आहे. भ्रष्टाचार विरहित सरकार आम्ही दिले. विशेष म्हणजे सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. असे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. भ्रष्टाचार मुक्त सरकार पुढील पाच वर्ष आम्ही देऊ असा विश्वास देतो, असेही श्री. तावडे म्हणाले.
कणकवली प्रतिनिधी