सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास राज्यस्तरीय आई पुरस्कार जाहीर

मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे येथे 11 मे रोजी होणार पुरस्कार वितरण

जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सुरेखाई प्रतिष्ठान राजापूर च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आई पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. 11 मे रोजी दुपारी 12वाजता मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. रोख रक्कम 5 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुरेखाई प्रतिष्ठान चे पुरस्कार वितरणाचे पहिले वर्ष आहे.रत्नागिरी येथील साहित्यिक डॉ जनार्दन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रा. मिलन सुनील जाधव असणार आहेत. पुणे येथील साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, कोल्हापूर येथील परिवर्तनशील साहित्यिक डॉ. सुरेश कुऱ्हाडे राजापूर येथील डॉ. मारुती कांबळे, खेड मधील डॉ गणेश मोरे ,मुंबईतील डॉ विनोद जाधव तसेच सुरेखाई प्रतिष्ठान चे डॉ सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास याआधी काव्य रसिक मंडळ डोंबिवली, ATM पुरस्कार पुणे, सारांश पुरस्कार मिरज, कदंब पुरस्कार कोल्हापूर, काव्य गौरव पुरस्कार बुलढाणा आदी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरोगामी विचारांची कास धरून संयमी विद्रोह आणि अत्यंत सकारात्मक बदलांची अपेक्षा राखायला हवी निजखूण मधील कविता करतात. मराठी साहित्याजगतात अल्पावधीत राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाने आपली मोहोर उमटवली आहे. वर्षभरातच राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून वाचकरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काव्यसंग्रहाला मिळत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला साहित्यिक काव्यप्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेखाई प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!