पेण शहरात महायुतीची प्रचार रॅली ;कोळटकर गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवला…

घड्याळ चिन्हावरील बटन दाबून सुनिल तटकरे यांना विजयी करण्याचे केले आवाहन;व्यापाऱ्यांशी व कोळीबांधवांशी आमदार अनिकेत तटकरे यांनी साधला संवाद…
पेण – महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आज पेण शहरात महायुतीच्या नेत्यांनी जोरदार रॅली काढत खासदार सुनिल तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या रॅलीच्या अगोदर पेण शहरातील प्रसिद्ध कोळटकर गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. त्यानंतर शहरातून ढोलताशांच्या गजरात रॅली काढत प्रचारपत्रके वाटण्यात आली. यादरम्यान पेण बाजारपेठेत असणार्या सर्व देवस्थानांमध्ये जात आमदार अनिकेत तटकरे आणि महायुतीच्या नेत्यांनी सुनिल तटकरे यांना विजयी करण्याचे साकडे घातले. त्याचबरोबर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी, कोळीबांधवांशी संवाद साधत घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहनही केले.
या रॅलीमध्ये महायुतीच्या नेत्यांवर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या प्रचार रॅलीमध्ये माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानपरिषदेतील पक्षप्रतोद आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.





