आयनल होळी उत्सवासाठी पार्टी नं. १ च्या सूर्यकांत साटम गटाला परवानगी

पार्टी नं 1 च्या वतीने ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद

आयनल येथील श्रीदेव नागेश्वर पावणाई देवीचा वार्षिक होळीउत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सूर्यकांत साटम या गटाला कार्यकारी दंडाधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. २४ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत हा उत्सव शांतताभंग न होता साजरा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच पार्टी नं. २ यांना उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे या आदेशात म्हटले आहे. पार्टी नं. १ च्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आयनल येथील देवस्थानमध्ये उत्सव साजरा करण्यावरून पार्टी नं. १ चे कै. गंगाराम साटम वगैरे व पार्टी नं. २ चे. गजानन साटम वगैरे यांच्यात वाद आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीदेव नागेश्वर पावणाई देवीचा होळी उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला होता. यात दोन्ही पार्थ्यांमध्ये असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शांतताभंग होऊन अप्रिय घटना घडू शकते, असे अहवालात नमूद करत बंदी लावण्याची शिफारस करण्यात आली होती.
दरम्यान, यावर कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे दोन्ही पार्त्यांच्यावतीने वकिलांनी युक्तीवाद केला. युक्तीवादानंतर जिल्हा न्यायालयाचा सन २०१८ चा निकाल तसेच सन २०२३ मध्ये नवरात्रोत्सवासाठी लागू केलेल्या बंदी आदेशावर जिल्हा न्यायालयाचा झालेला निकाल विचारात घेण्यात आला. तसेच दोन्ही पार्थ्यांना आपापसात समेट घडविण्यासाठी अवधी देण्यात आला. मात्र, दोन्ही पार्थ्यांची समेटाबाबत कोणतीही भूमिका नसल्याने तसेच कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे यापूर्वीचे आदेश विचारात घेऊन पार्टी नं. १ ला होळीउत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!