मतदान माझा हक्क, मी मतदान करणार!
आम्ही कणकवलीकर व पत्रकार यांच्यामार्फत सह्यांची मोहीम
प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची उपस्थिती
लोकसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी निवडणूक प्रशासन विभागाकडून मतदारांमध्ये जनजागृती मोहिम राबवली जात आहे. कणकवली तालुक्यात मंगळवारपासून प्रत्येक शाळांमध्ये जनजागृती फेरी, पथनाट्य, दिव्यांग मेळावे आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयामध्ये ‘मतदान माझा हक्क आहे…मी मतदान करणारच’ अशा टॅगलाईनखाली आम्ही कणकवलीकर व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत सह्यांची मोहिम राबवण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कणकवली उपविभागाचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, निवडणूक नायब तहसीलदार सौ. प्रिया हर्णे, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, श्री. नागावकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, भालचंद्र मराठे, मनोहर पालयेकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, विलास कोरगांवकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, पत्रकार संतोष राऊळ, चंद्रशेखर देसाई, लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, भगवान लोके, विजय गावकर, राजन चव्हाण, विराज गोसावी, संजय पेटकर, श्री. तांबे आदींसह नागरिक उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेले दिव्यांग बांधव आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरातूनच मतदान करता येणार आहे. यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत डी फॉर्मचे वाटप केले जात आहे. तो फॉर्म भरून देणार्या अशा मतदारांची मतदानाच्या अगोदर काही दिवस त्यांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर यांनी सांगितले. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कणकवली प्रतिनिधी