१. पुस्तकाचे गाव

पुस्तकांचे गाव-विस्तार योजनेचा शुभारंभ

पुस्तकांचं गाव या प्रकल्पाच्या विस्तार योजनेतील मालपेवाडी, पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालनाच्या उद्घाटन आणि लोकार्पणाचा सोहळा मा. मंत्री, मराठी भाषा यांच्या हस्ते दि. १० मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

“हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचं गाव” ही संकल्पना अस्तित्वात आली. पुस्तकांचं गाव या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना आकारास आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन दि.४ मे, २०१७ रोजी करण्यात आले होते.

विस्तार योजनेतील मालपेवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात मालपे ॲग्रो टूरिझम यांच्या कार्यालयात पुस्तकांचं गाव कार्यरत करण्यात येत असून पुढील काळात गावातील अन्य ठिकाणीही पुस्तकांची दालने सुरू करण्यात येणार आहेत. विविध साहित्य प्रकारांनुसार तसेच सर्वकाळ लोकप्रिय असणारी पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे वाचकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी साहित्याचे जाणकार आणि तज्ज्ञ वाचक यांची एक पुस्तक-निवड-समिती गठित करण्यात आली होती. या समितीद्वारे विचार विनिमय होऊन पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात मराठी साहित्याचे वाचक व अभ्यासक या ग्रंथदालनाचा लाभ घेऊ शकतील.

पहिल्या टप्प्यातील विस्तार योजनेतील मालपेवाडी, पोंभुर्ले येथील पुस्तकांच्या गावाच्या उद्घाटनानंतर पुढील काळात वेरुळ, नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचं गाव उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. लवकरच ही गावेही वाचक-पर्यटकांसाठी सुरू होतील.

डॉ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

२. कवितेचे गाव

भारतातील पहिल्या कवितेच्या गावाचे उद्घाटन

“हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना अस्तित्वात आली. भिलार येथे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून अस्तित्वात आले. याच धर्तीवर भारतातील पहिले कवितेचे गाव, कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे जन्मगाव असलेल्या उभादांडा, ता. वेंगुर्ला येथे अस्तित्वात येत असून दि. १० मार्च २०२४ रोजी मा. मंत्री, मराठी भाषा यांच्या हस्ते दि. १० मार्च २०२४ रोजी उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मराठी कवितांच्या संपदेचा प्रसार होण्याच्या दृष्टीने कवितेचे गाव हा प्रकल्प हाती घेण्याची संकल्पना मा. मंत्री मराठी भाषा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

त्या अंतर्गत तळकोकणातले ‘उभादांडा’ या गावात हे ‘कवितांचं गाव’ उभं राहणार आहे. हे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्म गाव.

१. वाचकांचे साहित्यातील काव्यप्रकार या विषयाकडे लक्ष वेधून घेणे.

२.नवीन काव्य निर्मिती व कवितांचे रसग्रहण याला प्रोत्साहन देणे.

३.श्रेेष्ठ कवी आणि प्रसिद्ध कवींची माहिती व त्यांचे साहित्य यांची नवीन पिढीला ओळख करून देणे.

४. कवितेचे गाव या प्रकल्पातून साहित्य पर्यटन या प्रकाराला चालना देणे. इत्यादी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

तसेच या कवितेच्या दालनात विविध काव्यप्रकार समाविष्ट करण्यात येणार आहेत. मंगेश पाडगांवकरांच्या काव्यसंपदेबरोबरच इतरही कवींची काव्यसंपदा येथे ठेवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!