…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

कुडाळ भाजपचा आमदार वैभव नाईक यांना कडक इशारा
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करू नये
आमदार वैभव नाईक यांची ‘ मान न मान मै तेरा मेहमान’ अशी ख्याती
प्रतिनिधी । कुडाळ : ‘मान न मान मै तेरा मेहमान’ अशी ख्याती असणाऱ्या वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करून करू नये.अन्यथा आम्हाला देखील आमच्या स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा इशारा कुडाळ तालुका भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि दादा साईल यांनी दिला आहे.
दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2022-23 या वर्षासाठी जिल्हा रस्ते निवड समिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांची सभा दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी पालकमंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करायच्या रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती आणि दर्जा नुसार निवड करण्यात आली. यामध्ये कुडाळ तालुक्याला सुमारे 36 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची मान्यता मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री .नारायण राणे आणि कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या मागणीनुसार कुडाळ तालुक्यातील सुमारे 36 किलोमीटर लांबीचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दुरुस्ती आणि मजबुती करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षभर या मंजूर झालेल्या रस्त्यांची काही तांत्रिक अडचणीमुळे निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु माजी खासदार निलेश राणे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मागणीनुसार सदरचे रस्ते आता निविदा प्रक्रिया होऊन मक्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना नेहमीप्रमाणे विकास कामे मंजूर झाल्यानंतर त्या विकास कामांचे भूमिपूजन करून श्रेय लाटण्यासाठी प्रयत्नशील असतात. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये अशाच काही कामांचे आदेश नसताना श्रेय लाटण्यासाठी घाईगडबडीत भूमिपूजन करण्याचा घाट स्थानिक आमदारांनी घातलेला आहे. वास्तविक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर कोणत्याही कामांचे अद्याप कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व रस्त्यांची शासकीय भूमिपूजन रीतसर करण्यात येतील. परंतु तत्पूर्वीच कोणत्याही प्रकारचे कार्यारंभ आदेश नसताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न जर वैभव नाईक यांनी केला असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते वैभव नाईक यांना जशास तसे उत्तर देतील. यापूर्वीही जनतेची दिशाभूल करून आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी वैभव नाईक यांनी आपला कोणताही संबंध नसलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा प्रयत्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हानून पाडला आहे..
यापूर्वीही कुडाळ तालुक्यातील राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर विविध विकास कामांची शासकीय उद्घाटन आणि भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहेत. या कार्यक्रमांना स्थानिक आमदार म्हणून वैभव नाईक यांना निमंत्रण असताना देखील त्यांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती. शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहायचे नाही आणि आपण स्वतः श्रेय लाटण्यासाठी त्या कामांची भूमिपूजन करायची अशी दुटप्पी भूमिका इथल्या स्थानिक आमदारांनी घेऊ नये.. आता देखील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर रस्त्यांच्या रस्त्यांची शासकीय भूमिपूजन हे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच पार पडतील आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून आपले या विकास कामांमध्ये असलेले योगदान आणि पाठपुरावा स्पष्ट करावा असे आव्हान देखील भाजपा मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आणि दादा साईल यांनी केले आहे..
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.