आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!
कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या सीमांकन हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारा व अंडरपासला जोडणाऱ्या सर्विस रस्त्याचे काम करण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी काही महिन्यापूर्वी याबाबत ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यां सोबत घेतलेल्या बैठकीदरम्यान तातडीने हे काम सुरू करा अशा सूचना दिल्या होत्या. या ठिकाणच्या भूसंपादन झालेल्या जमिनीचा ताबा लगेचच देण्याचे आश्वासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले होते. प्रांताधिकार्यानी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्या बैठकीनंतर आठ दिवसातच त्या जागेचा ताबा देण्यात आला. व त्यानंतर हे काम हाती घेण्यात आले. साकेडी अंडरपासपासून 250 मीटर लांबीचा हा सर्विस रस्ता केला आहे. परंतु अद्याप अनेक कामे प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्ष हा सर्विस रस्ता अपूर्ण असल्याने अडचणीचे बनले होते. तसेच कणकवली हुन साकेडी, किंवा करंजे, नागवे आदी भागांमध्ये साकेडी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना हुबरट मध्ये जाऊन साकेडी रस्त्याला यावे लागत होते. किंवा जानवली रतांबी व्हाळ येथे असलेल्या अनधिकृत मिडल कट मधून अनेक जण विरुद्ध दिशेने साकेडी रस्त्याला जात असल्याने अपघात होण्याची देखील भीती होती. आमदार नितेश राणे यांनी दोन महिन्यांपूर्वी या स्थितीची पाहणी देखील केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या निवासस्थानी बैठक घेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यावेळी महामार्गाचे शाखा अभियंता डी. जी. कुमावत देखील उपस्थित होते. मात्र आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे साकेडी फाट्यानजीक नवीन रस्ता केलेल्या ठिकाणी अंडरपास जवळ दिशादर्शक फलक लावणे व कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत अंडरपास संपल्याच्या ठिकाणी रेलिंग बसवणे, साकेडी फाटा ठिकाणी डांबरीकरण, गटार वरील माती हटविणे, पोल मध्येच आल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग करणे, अंडरपास ठिकाणी नवीन सर्व्हिस रस्ता झाला तेथे व पलीकडील बाजूस सेफ्टी गार्ड बसवणे, आदी कामे मात्र ठेकेदार कंपनीकडून अद्याप करण्यात आलेली नाहीत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची असून, देखील याकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. या बाबत वारंवार अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून देखिल दुर्लक्ष होत आहे.
दिगंबर वालावलकर / कणकवली