अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार यांची मत्स्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार यांनी नुकतीच मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते. हे महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले महाराष्ट्रातील पहिले शासकीय मत्स्य महाविद्यालय आहे. या भेटीत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदूलकर यांनी मत्स्य महाविद्यालयाच्या गेल्या ४३ वर्षांतील ठळक शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण अनुप कुमार यांच्यासमोर केले. आजपर्यंतची महाविद्यालयाची वाटचाल हि संतोषजनक आणि चमकदार असल्याचे प्रतिपादन अनुप कुमार यांनी केले. तद्नंतर त्यांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख आणि ज्येष्ठ प्राध्यापक यांच्याकडून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यक्रमांची पुढील दिशा कशी असेल हे जाणून घेतले. “मच्छीमार समाजात शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला आहे, तो या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल आणि प्रत्येक मच्छीमार बांधव आपलं जीवन सुखी, समृध्दी कसे करेल यासाठी महाविद्यालयाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असणार आहे “, असे प्रतिपादन अनुप कुमार यांनी केले. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयाने मत्स्यव्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी आणि मच्छीमारी संसाधनांच्या संवर्धकांकरीता अतिशय उपयुक्त शिफारशी शासनाकडे सादर केल्या आहेत, त्या शिफारशी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला मार्गदर्शक ठरल्या आहेत. परंतु, सद्या मत्स्य व्यवसायाच्या विकासात अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्या अडथळा निर्माण करीत आहेत त्या समस्या सोडविण्याकरीता धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शास्त्रीय आधारावर शिफारशी महाविद्यालयांकडून याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयात असलेला उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, सर्व विभागातील संशोधन प्रकल्प आणि संशोधन सुविधा याबाबत अनुप कुमार यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी येथे सद्या पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रम विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. विद्यार्थी करीत असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांनी मच्छीमारांच्या अत्यंत गरजेच्या विषयावर संशोधन करावे, असा सल्ला त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी मत्स्य महाविद्यालयाच्या वतीने अनुप कुमार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान प्रतिक आणि भेटवस्तू देऊन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदूलकर यांनी सन्मान केला. अनुप कुमार यांच्या मत्स्य महाविद्यालयातील भेटीसाठीचे नियोजन व मार्गदर्शन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन्मा. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले. अनुप कुमार यांच्या भेटी प्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. अनिल पावसे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. केतन चौधरी, डॉ. आसिफ पागारकर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद सावंत, डॉ. रविंद्र पवार आदी उपस्थित होते. या भेटीत अनुप कुमार यांचे संपर्काधिकारी म्हणून डॉ. गजानन घोडे यांनी जबाबदारी पार पाडली.





