माणगावमध्ये २१ रोजी मंदिर परिषद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

मंदिरांचं जतन, संवर्धन तसंच विश्वस्त आणि पुजारी यांचं संघटन हा उद्देश

मंदिर महासंघाचे समानव्यक सुनील घनवट यांची पत्रकार परिषद

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयात २१ फेब्रुवारीला मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. . कुडाळ तालुक्यात माणगाव दत्त मंदिर येथे ही परिषद होणार आहे. हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्री दत्त मंदिर न्यास माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन अर्थात मंदिर परिषद होणार आहे. मंदिरांचे जतन, संवर्धन तसेच विश्वस्त आणि पुजारी यांचं संघटन निर्माण करणे या उद्देशाने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदू जनजागृती समिती तथा मंदिर महासंघाचे समानव्यक सुनील घनवट यांनीं दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या मंदिर परिषदेत निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी,पुरोहित, मंदिरांच्या संरक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ता आणि अभ्यासक असे ३०० हुन अधिक जण सहभागी होणार आहेत.
यावेळी बोलताना सुनील घनवट म्हणाले, मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरांतील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि सवंर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरातील धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. हे थांबले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्त, पुजारी यांचे संघटन, त्यांच्या समस्या सोडविणे तसेच सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे अशा विविध विषयाच्या अनुषगांने हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, श्री दत्तमंदिर न्यास, माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ यादिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिर येथे महाराष्ट्र मंदिर – न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला मुख्यत्वे माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, विरार (मुंबई) येथील जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ता आणि अभ्यासक आदी ३०० हून अधिकजण सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. घनवट यांनी दिली.
या मंदिर अधिवेशनात मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी न्यायालयीन लढा, वक्फ बोर्डच्या माध्यमातून मठ मंदिरांच्या बळकावलेल्या जमिनी याविरोधातील संघष, कुळकायदा, ‘मंदिरांचे पावित्र्य टिकवणे’, ‘मंदिरांतील सुव्यवस्थापनातून आणि उत्पन्न सरकारी योजनांचा लाभ’, ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता आणि भावीदिशा’, ‘प्रशासन आणि मंदिर विकास यांच्यातील अडचणी’, ‘मंदिरांच्या यशस्वीतेसाठी धर्माधिष्ठीत कार्य करावे’, यांविषयी चर्चा होणार आहे.
जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती, तसेच दुसरी राज्य स्तरीय परिषद ओझर अष्टविनायक येथे घेण्यात आली. त्यानंतर गोवा आणि कर्नाटक राज्यातही मंदिर महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय मंदिर अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यााला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंदिर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ वर्षभरामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुरू झाले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात केवळ ६ महिन्यांत ४१५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. असे श्री घनवट यांनी सांगितले.
हे मंदिर अधिवेशन महासंघ परिषद केवळ निमंत्रित मंदिर विश्वस्त, पुरोहित, तसेच मंदिर क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी आहे त्यामुळे अन्य मंदिर विश्वस्त, पुरोहित यांना सहभागी व्हायचे असल्यास ७०५७०६४६०२ याक्रमांवर संपर्क साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ कडून करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला सुनील घनवट यांच्यासह माणगाव येथील श्री दत्त मंदिर न्यासाचे श्री.काणेकर, अरावली येथील श्री देव वेतोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष जयवंत राय, सद्गुरू सत्यवान दादा, यशवंत परब,, कविलकाटे येथील श्री साई मंदिरचे राजन माडये, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!